ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन व्हावे यासाठी आमरण उपोषण

मुंबई, दि. १९ (एमएसमी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही काळापासून राज्यामध्ये मराठा, ओबीसी आणि अन्य समाज घटक आरक्षण, सवलती मिळवण्यासाठी आंदोलने, उपोषण अशा विविध मार्गांचा अवलंब करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहेत. सर्वसाधारण गटामध्ये असूनही ग्रामीण आणि शहरी भागांतही विविध आर्थिक समस्यांचा सामना करणारा ब्राह्मण समाज मात्र आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी फारसा सक्रीय नव्हता. मात्र आता ब्राह्मण समाज समाजाच्या उन्नतीसाठी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी सकल ब्राह्मण समाजाकडून शनिवार पासून मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू आहे. पदुदेवा जोशी पालमकर उर्फ रामराव दिनकरराव जोशी व अनंत (अविनाश) देवीदासराव जोशी हे उपोषणासाठी बसले आहेत.
उपोषकर्त्यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार, ब्राह्मण समाज समाजाची (Mumbai )उन्नती व्हावी यासाठी भगवान श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन करण्यात यावे यासाठी हे उपोषण सुरु आहे.मंडळाची स्थापना झाल्यानंतर महामंडळाद्वारे ब्राम्हण समाजाचे सर्व प्रश्न सुटतील. लोकशाही पध्दतीने शासना समोर या मागणीसाठी रितसर विनंती अर्ज देखील शासनाच्या सर्वच विभागाकडे देण्यात आलेले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये ही लोकप्रतिनिधींना विनंती अर्ज देण्यात आलेले आहेत.विधिमंडळ अधिवेशनात राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके यांनी श्री परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची मागणी एका लक्षवेधी सूचना मांडून केली होती.

दरम्यान परभणी विधान सभा मतदार संघ ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
SL/KA/SL
19 Oct. 2023