शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाताही बनावे
नाशिक, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपारिक पीक गहू हरभरा मका कांदा यासारख्या पिकां मध्ये आता पैसा नसून शेतकऱ्यांना पैसा कमवायचा असेल तर तो इथेनॉल आणि इतर हरित इंधनामध्ये आहे. हरित इंधन हेच भविष्यकालीन इंधन आहे. इथेनॉल आणि अन्य हरीत इंधन बनविणाऱ्या पिकांवर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करावे असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील कृषीमाल निर्यात क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना दिला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यावेळी द्राक्ष निर्यात क्षेत्रात द्राक्ष उत्पादनामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या मान्यवर द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सह्याद्री फार्मचे मुख्य संचालक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योजक विलास शिंदे , भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, द्राक्ष बागातदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, विदर्भातील महाऑरेंज चे संचालक श्रीधर ठाकरे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते .
भावी काळात इथेनॉल हायड्रोजन हीच आता वाहनांसाठी प्रमुख इंधन म्हणून प्रचलित होतील, शेतकऱ्यांनी यासाठी लागणारे शेती उत्पादन विकसित केल्यास देशाच्या इंधन आयातीवरचा मोठा खर्च वाचू शकेल देशाला डांबराची मोठ्या प्रमाणामध्ये गरज लागते. मात्र आजही मोठ्या प्रमाणामध्ये डांबर आयात करावे लागते भाताच्या तुसापासून डांबर निर्मिती करणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी त्यामध्ये ही लक्ष घालावे नापिक रेताड जमिनीमध्ये किंवा पाण्याची उपलब्धता नसणाऱ्या जमिनीमध्ये बांबूचे पीक उत्तम प्रकारे घेता येते. खर्चाच्या तिप्पट उत्पन्न या पिकातून मिळते औष्णिक वीज केंद्र चालविण्यासाठी बांबूचा इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.
आज औष्णिक वीज केंद्र चालविण्यासाठी देशाला बांबूच्या इंधनाची इतकी गरज पडेल की शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करणे ही शक्य होणार नाही अशा प्रकारच्या इंधन निर्मिती करणाऱ्या पिकांमध्ये शेतकऱ्यांनी लक्ष घालावे. त्याचप्रमाणे मागणी कोणत्या पिकाला आहे याचा अभ्यास करून मागणी आणि पुरवठा याचा विचार करून उत्पादन घेतल्यास भावाचा प्रश्नच निर्माण होणार नाही असेही गडकरी म्हणाले सह्याद्री फार्म या संस्थेने कृषी क्षेत्रात केलेल्या दैदीप्यमान कामगिरीचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या मेळाव्यात आपण मार्गदर्शन करण्याऐवजी सह्याद्री फॉर्म या संस्थेकडूनच आपल्याला मार्गदर्शन घ्यायला पाहिजे असेही गडकरी म्हणाले अवकाळी पाऊस गारपीट असे वातावरण असतानाही या शेतकरी मेळाव्याला फ़लोउत्पादन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री गडकरी यांच्या हस्ते टाकाऊ शेतीमालातून बायोगॅस ऊर्जा निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटनही करण्यात आले. Farmers should become not only food providers but also energy providers
या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या वायुतून सह्याद्री फॉर्म ने वाहतुकीसाठी लागणाऱ्या आधुनिक ट्रक चालवाव्यात आणि खर्चात बचत करावी असा सल्लाही गडकरी यांनी दिला.
ML/KA/PGB
19 Mar. 2023