शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी , मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय

नाशिक , दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना अवकाळीची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लवकरच जाहीर करू , त्यासाठीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत लवकर घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.कालचा अयोध्येचा दौरा आटोपून आज मुख्यमंत्री शिंदे आज थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रिमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी. उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

ML/KA/PGB 10 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *