दिवाळी फराळ विक्रीतून सात दिवसांत १५ लाखांची उलाढाल.
ठाणे दि २४ : महिला विकास परिवाराने गेली सात वर्षे महिला बचत गटांतील सदस्यांच्या माध्यमातून दिवाळी फराळ विक्री केंद्रे चालवून शेकडो महिलांना रोजगार दिला आहे. यंदा दिवाळीच्या पाच दिवसांत आठ स्टॉलवर तब्बल १५ लाखांची उलाढाल झाल्याची माहिती संस्थेचे सल्लागार आमदार संजय केळकर यांनी दिली.
ठाण्यातील महिला विकास परिवाराशी ठाण्यातील अनेक महिला बचत गट जोडले गेलेले असून शेकडो महिला या परिवाराच्या सदस्या आहेत. परिवाराने राबवलेल्या उपक्रमांतून वर्षभर या महिलांना रोजगार मिळत असतो. गेली सात वर्षे दिवाळी फराळ विक्री केंद्रातून तीन हजार महिलांना रोजगार मिळाला असून ८० लाखांच्यावर उलाढाल झाली आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना केळकर म्हणाले, शहरात यंदा आठ फराळ विक्री केंद्रे चालविण्यात आली. सुमारे ४०० महिलांपैकी काहींनी फराळ तयार केला, काहींनी त्याचे पॅकिंग केले तर काहींनी विक्री केंद्रावर योगदान दिले. हा फराळ दर्जेदार आणि वाजवी दरात मिळत असल्याने नागरिकांनी केंद्रांना उदंड प्रतिसाद दिला. दिवाळीच्या पाच दिवसांत या व्यवसायातून १५ लाखांची उलाढाल झाली असून मिळालेला नफा महिलांना वाटण्यात आला. प्रत्येक महिलेला १४ ते १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड झाल्याची माहिती संजय केळकर यांनी दिली.ML/ML/MS