फनेल झोनमधील पुनर्विकासासाठी नियमात आता स्वतंत्र तरतूद

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील सांताक्रूझ, पार्ले आणि कुर्ला या भागात विमानतळाच्या फनेल झोनमधील उंचीच्या निर्बधांमुळे बाधित इमारतींचा पुनर्विकासास चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण तथा प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. यामुळे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यासंदर्भात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, फनेल झोनमधील इमारतींच्या उंचीवर मर्यादा असल्याने इमारतींचे बांधकाम, पुनर्विकास तेवढ्याच उंचीपर्यंत करता येतो. त्यामुळे या क्षेत्रातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना पुर्ण क्षमतेने (बेसिक + प्रिमियम एफ़एसआय + टिडीआर) परवानगीयोग्य संपुर्ण क्षेत्राचा वापर करून पुनर्विकास करणे शक्य होत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरीकांकडून वारंवार मागणी करण्यात आली आहे.
बृहन्मुंबई क्षेत्रातील उंचीचे निर्बंध असलेल्या विमानतळ फनेल झोन मधील जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुसह्य व्हावा याकरिता नियमावलीमध्ये विशिष्ट तरतूद करण्यासाठी बृहन्मुंबई विकास नियंत्रण तथा प्रोत्साहन नियमावली-२०३४ मध्ये स्वतंत्र तरतूद करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे.
त्यानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१कक) अन्वये फेरबदलाची सूचना जाहिर करण्यात येत आहे. या फेरबदलामुळे फनेल झोनमधील, तसेच अशा प्रकारे निर्बंध असलेल्या बृहन्मुंबई क्षेत्रातील इतर बाधित क्षेत्रातील जुन्या इमारतींचे पुनर्विकास सुसह्य होणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ML/ML/PGB 26 March 2025