या देशात होणार हत्तींचे कुटुंब नियोजन

बँकाँक, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पृथ्वीवरील सर्वांत महाकाय प्राणी असलेला हत्ती शक्ती आणि बुद्धीसाठी ओळखला जातो. शांत निवांत झुलणारे हत्ती तुम्ही पाहीले असाल. पण हेच हत्ती जेव्हा खाण्याच्या शोधात भटकंती करतात तेव्हा शेकडो एकरवरील पिकांची नासधुसही करतात. रागाला आल्यास धुडगुस घालून लोकांचा जीवही घेऊ शकतात. हत्तींपासून होणारा हा त्रास कमी करण्यासाठी आग्नेय आशियातील थायलंड या देशाने त्यांची संख्या नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. मानव-हत्तींमधील संघर्ष वाढल्याने थायलंड सरकारने काही प्रमाणात वन्य मादी हत्तींसाठी कुटंब नियोजनाचा प्रस्ताव मांडला आहे.
१९८६ पासून आशियाई हत्तींना धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. परंतु थाई अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की संवर्धन प्रयत्नांमुळे देशात हत्तींची संख्या दरवर्षी ८% दराने वाढत आहे. यामुळे जंगलांमध्ये त्यांचं प्रमाण वाढलं आहे. परिणामी हत्ती लोकवस्तीत शिरून माणसांना त्रास देतात. त्यांच्या शेती आणि घरांचं नुकसान करत असून यामुळे मानवी मृत्यूही वाढले आहेत.
मादी हत्तींना लक्ष्य करून घेतलेला स्पायव्हॅक लसीकरण सात वर्षांपर्यंत गर्भनिरोधक परिणाम देते. हे लसीकरण हत्तींच्या वर्तनात किंवा शारीरिक वैशिष्ट्यांमध्ये बदल करत नाही, तर फक्त त्यांच्या संप्रेरक पातळीचे नियमन करते जेणेकरून त्यांना गर्भधारणा होत नाही. एप्रिलमध्ये सात मादी हत्तींवर हे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आले आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत.
SL/ML/SL
11 Feb. 2025