फडणवीस – शिंदे यांची झाली भेट, मंत्रिमंडळ स्थापनेला वेग
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर आणि दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तब्बल चार दिवसांनी आज त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर भेट झाली. यात मंत्रिमंडळ स्थापने संदर्भातील रखडलेले विषय मार्गी लागल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे यांनी आधी मुख्यमंत्रीपदावरती सांगितलेला दावा गेल्या आठवड्यात बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सोडला आणि नरेंद्र मोदी तसेच अमित शहा सांगतील त्याप्रमाणे होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासाठी आमचा भाजपला पाठिंबा राहील असे जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री उशिरा अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र भेट घेतली होती
या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी पुढील दोन दिवसानंतर राज्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होऊन सरकार स्थापने संदर्भातील पुढील चर्चा होईल असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर ते त्यांच्या गावी गेल्यावर आजारी पडले. तिथून परत आल्यानंतरही सोमवारी त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता त्यामुळे ही चर्चा तीन दिवस होऊ शकली नाही. त्यानंतर आज खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी आपली तपासणी केल्यावर ते नियमित कामकाजात सहभागी झाले .
काल रात्री देवेंद्र फडणवीस यांचे दूत गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची ठाण्यातल्या निवासस्थानी भेट घेतली आणि दोघांमध्ये असलेली कोंडी फुटली अशी चर्चा आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबतच गृहमंत्रीपद ही हवे आहे मात्र भाजपा ते देण्यास तयार नाही, यामुळे काहीशी तेढ निर्माण झाली होती. मात्र आज सायंकाळी देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन शिंदे यांची भेट घेतली आणि त्यात हा तिढा, त्यासोबतच मंत्रिमंडळातील जागावाटप आणि चेहरे या संदर्भात चर्चा केल्याचे समजते . त्यातून पाच तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
शिंदे आणि फडणवीस यांच्या भेटीत शिवसेनेला देण्यात यायची खाती आणि त्यांचे मंत्रिमंडळातील चेहरे यासंदर्भात चर्चा झाली असल्याचे समजते . अमित शहा यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे चेहरे नेमके कोण असतील याबाबतची कल्पना फडणवीस यांनी शिंदे यांना दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येत्या पाच तारखेला शिंदे यांच्याकडून शिवसेनेचे किती आणि कोणते आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील हे आता अधिक स्पष्ट होईल.
ML/ML/PGB
3 Dec 2024