UPI पेमेंटसाठी वापरले जाणार चेहरा आणि फिंगरप्रिंट
मुंबई, दि. ७ : केंद्र सरकारने UPI प्रणालीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. UPI (Unified Payments Interface) चालवणाऱ्या राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या नवीन बायोमेट्रिक फीचर्सना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे UPI वापरकर्ते आता त्यांच्या चेहऱ्याच्या ओळखीचा (Face Recognition) आणि बोटांच्या ठशांचा (Fingerprint Authentication) वापर करून सहज आणि सुरक्षितपणे डिजिटल पेमेंट करू शकतील.
NPCI लवकरच यासंबंधी सविस्तर वापरकर्ता मार्गदर्शिका (User Manual) आणि अंमलबजावणीची तारीख जाहीर करणार आहे. या नव्या प्रणालीमुळे UPI व्यवहार अधिक वापरकर्ता-अनुकूल, सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. यापूर्वी UPI व्यवहार करताना वापरकर्त्यांना पिन टाकावा लागत असे, परंतु बायोमेट्रिक प्रमाणीकरणामुळे आता पिनची गरज कमी होईल किंवा काही व्यवहारांसाठी पूर्णपणे टाळता येईल.
या नव्या तंत्रज्ञानाचा उद्देश म्हणजे डिजिटल व्यवहारांमध्ये सुरक्षा वाढवणे, फसवणुकीची शक्यता कमी करणे आणि वृद्ध, अपंग किंवा अशिक्षित वापरकर्त्यांसाठी व्यवहार सुलभ करणे. चेहरा आणि फिंगरप्रिंटद्वारे ओळख पटवणे हे पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक सुरक्षित मानले जाते, कारण हे वैयक्तिक आणि बदलता न येणारे बायोमेट्रिक घटक आहेत.
NPCI च्या या पुढाकारामुळे भारतातील डिजिटल पेमेंट्सच्या क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला जात आहे. बायोमेट्रिक आधारित UPI व्यवहार हे डिजिटल इंडिया मोहिमेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, देशभरात डिजिटल व्यवहारांचा वेग आणि विश्वासार्हता वाढवण्यास मदत करणार आहेत. वापरकर्त्यांनी आता त्यांच्या UPI अॅप्समध्ये या नव्या फीचर्ससाठी अपडेट्सची वाट पाहावी लागेल, जे लवकरच उपलब्ध होतील.
SL/ML/SL 7 Oct. 2025