आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यास मुदतवाढ
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून निवडणूका पारदर्शी होण्यासाठी सर्वतोपरिने तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणजे आधार कार्डाशी मतदार ओळख पत्र लिंक करणे. मतदान ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी यापूर्वी शेवटची मुदत ही 01 एप्रिल 2023 होती.आता मतदानला आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ केली आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केले आहे.
सरकारने अधिसूचना जारी करत म्हटले की, आतापर्यंत मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2023 होती, जी आता 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच आता कार्डधारकांना हे काम पूर्ण करण्यासाठी 1 पूर्ण वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळेल. आधार आणि मतदार ओळखपत्र (Voter ID) लिंक करण्याचे काम पूर्णपणे ऐच्छिक असून ते बंधनकारक करण्यात आलेले नाही, असेही यावेळी सरकारने म्हटले आहे. तसेच जर कोणी असे केले नाही तर त्याच्यावर कोणतीही कारवाई देखील केली जाणार नाही.
मात्र, त्याच वेळी निवडणूक आयोगाकडून हे दोन्ही कार्ड लिंक करण्याचे अनेक फायदे देखील सांगण्यात आले आहेत. आयोगाचे म्हणणे आहे की,”यामुळे योग्य मतदाराची ओळख पटवणे आणि कोणत्याही मतदारसंघात एकाच नावाने दोन नोंदणी होण्यासारख्या गोष्टी टाळता येतील.”
मतदान कार्डला आधार लिंक कसे करावे?
1.सर्व प्रथम ‘NVSP’ च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तेथे Forms या पर्यायावर क्लिक करा.जर तुम्ही आधी नोंदणी (Register) केली असेल तर, तुमचे वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘लॉग इन’ क्लिक करा.
2.जर तुम्ही नोंदणी किंवा Register केली नसल्यास तुम्हाला नवीन वापरकर्ता किंवा New Register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागणार.
3.नंतर Form 6B वर क्लिक करून तुमचे राज्य आणि विधानसभा/ मतदारसंघ निवडा.
4. तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा, OTP, आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘Preview’ बटणावर क्लिक करा.
5.सबमिट बटणावर क्लिक करा, तुमच्या अर्जाचा मागोवा घेण्यासाठी एक Reference क्रमांक दिला जाईल.
SL/KA/SL
27 March 2023