मतदानाच्या दिवशी मुंबई मेट्रोच्या सेवा कालावधीत वाढ
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचणे आणि रात्री उशिरा घरी परतणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मार्गिकावरील सेवा बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५.५५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुरू होईल. तसेच मेट्रो सेवा रात्री ११.३३ ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील.
मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ करण्याची विनंती मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि एमएमआरडीएला केली होती. त्यानुसार एमएमओपीलएने याआधीच ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. एमएमओपीएलच्या निर्णयानुसार बुधवारी ‘मेट्रो १’ची सेवा पहाटे ४ ते मध्यरात्री १ दरम्यान सुरू राहणार आहे. ‘मेट्रो १’पाठोपाठ आता एमएमआरडीएनेही ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
SL/ML/SL
18 Nov. 2024