साहित्य अकादमी संकेतस्थळावरून मराठी हद्दपार
मुंबई, दि. १० ( संध्या लिमये ) : देशातील साहित्य विषयक काम करणारी सर्वोच्च साहित्य संस्था ‘साहित्य अकादमी’SAHITYA AKADEMI च्या संकेतस्थळावरून मराठी भाषाच हद्दपार असल्याची अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह बाब निदर्शनास आली आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या या प्रतिथयश संस्थेच्या संकेतस्थळावरील Publications या विभागातील E-Books या विभागात Sahitya Akademi’s Publications – (Makers of Indian Literature) या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाषांच्या यादीमध्ये मराठी भाषेचा साधा उल्लेख देखील करण्यात आलेला नाही.
सध्या Website च्या E-book विभागात इंग्लिश, हिंदी, कोकणी, बंगाली,डोग्री, गुजराती, उर्दु, तमिळ, सिंधी, संस्कृत, पंजाबी, नेपाळी, मल्याळी, मैथिली, कश्मिरी आणि कन्नड या १६ भाषांची नावे दिसत असून यामध्ये संबंधित भाषांची काही पुस्तके उपलब्ध असल्याचे दिसते. ( https://sahitya-akademi.gov.in/publications/e-books.jsp) मात्र या यादीमध्ये मराठी भाषेचा साधा उल्लेखही नाही.
त्यामुळे साहित्य अकादमीला मराठी साहित्यिक Makers of Indian Literature प्रकल्पात समाविष्ट करण्याच्या पात्रतेचे वाटत नाहीत का? नेहमी प्रमाणेच मराठी भाषेला डावलून अन्य भाषांवर प्राधान्याने E-Book निर्मितीचे काम सुरु आहे? या यादीत मराठीचे नाव समाविष्ट करण्याची तसदी घ्यावी असे वाटू नये का? एरव्ही मराठी भाषेचे झेंडे मिरवणारे राजकीय नेते आणि संमेलनात रमलेले साहित्यिक साहित्य अकादमीच्या या उपद्व्यापबाबत अनभिज्ञ कसे? असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
लक्षणिय बाब म्हणजे कोकणी,डोग्री, नेपाळी या अतिशय कमी भाषिक समूह असलेल्या भाषांचा समावेश या यादीत आहे मात्र १४ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मराठी भाषेचे साधे नावही नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. शिवसेना, मनसे यांसारखे पक्ष दुकानांच्या पाट्या मराठी असाव्यात म्हणून आंदोलने करण्यातच धन्यता मानतात आणि साहित्य अकादमी सारख्या महत्त्वपूर्ण संस्थांच्या संकेतस्थळावर मराठी भाषेची सुरु असलेली ही गंभीर हेळसांड दुर्लक्षित करतात, हे त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण आहे असे म्हटल्यास गैर ठरू नये.
सल्लागार मंडळही अनभिज्ञ
दरवर्षी मराठी भाषेच्या नावाने साहित्य संमेलनाचा माहोल करण्यात मश्गुल असलेल्या मराठी साहित्यिकांनांही साहित्य अकादमीच्या या मराठीकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबत फारसे गांभीर्य नाही. साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार मंडळावर मराठीतील १० प्रख्यात साहित्यिक विराजमान आहेत. असे असतानाही E- Book विभागात मराठी भाषेचा साधा उल्लेखही नसण्याची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनासही येऊ नये हे अत्यंत दुर्देवी आहे.
याबाबत ज्येष्ठ लेखक साहित्य अकादमीचे मुख्य मराठी भाषा सल्लागार आणि सेंट्रल कमिटीचे सल्लागार विश्वास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, “दोन महिन्यांपूर्वीच साहित्य अकादमीवर आमच्या मराठी भाषा सल्लागार समितीची निवड झाली आहे. त्यामुळे इ-बुक्स प्रकल्पाबाबत माझ्याकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. याबाबत तुम्ही साहित्य अकादमी रिजनल सेक्रेटरी, मुंबई ओम नागर यांच्याशी संपर्क साधा. तरी अशा प्रकारे साहित्य अकादमीच्या संकेतस्थळावर मराठी E-Books नसतील तर ती उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करेन.’
विभागीय कार्यालयात हिंदीतून संवाद
या संपूर्ण प्रकाराबद्दल साहित्य अकादमीच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयातील विभागीय सचिव ओम नागर म्हणाले की, ” साहित्य अकादमीने मराठी भाषेमध्ये ३०० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. मात्र E-Book आणि Website वरील मजकूराबाबतचे काम मुख्य कार्यालयातून चालते.विविध भाषांतील इ-बुक्स वर साहित्य अकादमीच्या मुख्य कार्यालयातून काम सुरु आहे. पुस्तके जशी उपलब्ध होतील तशी ती Website वर उपलब्ध होतील.” मात्र साहित्य अकादमी Website वरील Sahitya Akademi’s Publications – (Makers of Indian Literature) या खाली दिलेल्या यादीत मराठी भाषेचा साधा उल्लेखही का नाही, याचे उत्तर मात्र विभागीय सचिव नागर यांना देता आले नाही. तसेच मराठी E-BooKs बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत बोलताना नागर यांनी हिंदीतूनच उत्तरे देण्यास प्राधान्य दिले ही आणखी एक गंभीर बाब आहे.
ML/KA/SL
10 Oct. 2023