साखर कारखान्यात CNS गॅस निर्मितीचा प्रयोग

अहिल्यानगर, दि. 4 : देशात सध्या सीएनजी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून, सीएनजी हे पर्यावरणपूरक आणि सर्वात स्वस्त इंधन माध्यम मानले जाते. यामुळे देशभरात सीएनजी गॅसची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर भारतातील पहिला सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला आहे. उद्या या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर प्रत्यक्षात सीएनजी निर्मिती सुरू होणार असून विक्री प्रक्रियेलाही सुरुवात केली जाणार आहे. पर्यावरणपूरक आणि ऊर्जादायी अशा या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीला नवी दिशा मिळणार असून, देशभरात अशा प्रकल्पांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना (संजीवनी साखर कारखाना) यांनी हा प्रकल्प राबवला असून, हा प्रकल्प सहकार क्षेत्रातील देशातील पहिला सीएनजी बायोगॅस आणि पोटॅश निर्मिती प्रकल्प ठरला आहे.
या प्रकल्पात साखर कारखान्यातील वाया जाणारे सांडपाणी आणि डिस्लेरी स्पेंड या कच्च्या मालातून मिथेन वायू काढून सीएनजी तयार केला जाणार आहे. या प्रक्रियेमुळे कारखान्याला ऊर्जा मिळणार असून उत्पन्नातही लक्षणीय वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. “अन्नदाता ते उर्जादाता” या संकल्पनेतून सुमारे ५० कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. दररोज १२ टन सीएनजी निर्मिती केली जाणार असून, तयार झालेला गॅस पेट्रोलियम कंपन्यांना विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
SL/ML/SL 4 Oct. 2025