माजी महापौर दत्ता दळवींना जामीन मंजूर
मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क) : भांडूपमधील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक कारवाई झालेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर झाला आहे. मुलुंडच्या न्यायालयाने काही अटीशर्ती आणि 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.
26 नोव्हेंबरला भांडुपमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात दत्ता दळवी यांनी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं. स्वत:ला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेतात, असं म्हणत त्यांनी एक शिवी दिली आणि हिंदूहृदयसम्राटचा अर्थ माहिती आहे का? आज आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदे यांना चाबकाने फोडून काढलं असतं, असं म्हणाले होते.
दळवी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या विषयी केलेल्या आक्षेप हा विधानाची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या तक्रारी भांडूप पोलीस ठाण्यात मंगळवारी दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
बुधवारी सकाळी दळवी यांना त्यांच्या घरातून अटक केली. त्यानंतर मुलुंड न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. पण यानंतरही दत्ता दळवी आपल्या विधानावर ठाम होते. “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे,” असं ते म्हणाले होते.
दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर मुलुंडचे महानगर दंडाधिकारी एम. आर. वाशीमकर यांच्यापुढे आज सुनावणी झाली. यावेळी
दंडाधिकारी एम. आर. वाशीमकर यांनी काही अटीशर्ती आणि 15 हजाराच्या जातमुचलक्यावर दळवी यांना जामीन मंजूर केला. दळवी यांच्यातर्फे अॅड. संदीप सिंह यांनी काम पाहिले.
SW/KA/SL
1 Dec. 2023