दरवर्षी २ लाख महिलांना मिळणार ‘विमा सखी योजने’द्वारे रोजगार
पानिपत, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील पानिपत येथून विमा सखी योजनेचा शुभारंभ केला. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारत महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सातत्याने पावले उचलत आहे. आजचा दिवस इतर कारणांनी खास असून आज ९ तारीख आहे. शास्त्रांमध्ये ९ हा अंक अत्यंत शुभ मानला असून त्याचा संबंध शक्तीशी आहे. या योजनेमुळे महिला सक्षम होतील आणि त्या आर्थिक भागीदार बनतील.
एलआयसीच्या विमा सखी योजनेअंतर्गत १८ ते ७० वर्षे वयोगटातील किमान १० वी उत्तीर्ण महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. या महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिल्या तीन वर्षांसाठी निश्चित मानधनही मिळणार आहे. समाजात आर्थिक शिक्षणाला चालना मिळावी आणि लोकांना विम्याबाबत जागरुक व्हावे यासाठी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विमा सखी सोसायटीत एलआयसी एजंट म्हणून काम करणार आहेत. एवढेच नव्हे तर पदवी धारण केलेल्या विमा सखींना भविष्यात एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधीही मिळणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विमा सखींना प्रतीकात्मकरित्या नियुक्तीपत्रही सुपूर्द केले आहे. या योजनेअंतर्गत विमा सखींना पहिल्या तीन वर्षांसाठी ५ ते ७ हजार रुपये मानधन मिळणार आहे. यानंतर ती विमा सखी म्हणून काम करेल आणि तिला प्रत्येक पॉलिसीवर कमिशन दिले जाईल. एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या योजनेसाठी अर्ज करता येतील. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत एलआयसीमध्ये आधीच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते, जी दहावी उत्तीर्ण आहे.
SL/ML/SL
9 Dec. 2024