प्रति कुटुंब 15 हजार रुपयांची बचत करणारी सूर्यघर योजना

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. या योजनेसाठी 75,021 कोटी रुपये खर्च येणार आहे. याअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना आहे. यासाठी एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली (मोफत वीज) योजना काय आहे?

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना ही केंद्र सरकारची योजना असून, आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच  बसवण्याचा निर्णय घेणाऱ्या भारतातील एक कोटी कुटुंबांना मोफत वीज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यामध्ये संबंधित कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 फेब्रुवारी रोजी मंजूर केलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून, यासाठी 75,021 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना कशी काम करते?

या योजने अंतर्गत 2 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या संचासाठी सौर युनिट खर्चाच्या 60% आणि 2 ते 3 किलोवॅट दरम्यान क्षमतेच्या संचासाठी अतिरिक्त प्रणाली खर्चाच्या 40 टक्के अनुदानाची तरतूद आहे. अनुदानाची मर्यादा 3 किलोवॅट क्षमतेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

म्हणजेच, सध्याच्या सर्वोत्तम किमतींनुसार 1 किलोवॅट क्षमतेच्या संचासाठी  30,000 रुपये अनुदान, 2 किलोवॅट क्षमतेच्या संचासाठी 60,000 रुपये आणि 3 किलोवॅट किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या प्रणालीसाठी 78,000 रुपये अनुदान मिळेल.

योजनेसाठी अर्ज करायला कोण पात्र आहे?

1.   अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

2.   सौर पॅनेल बसवण्यासाठी योग्य छप्पर असलेले घर असणे आवश्यक आहे.

3.   कुटुंबाकडे वैध वीज जोडणी असणे आवश्यक आहे.

4.   सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजनेसाठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम, इच्छुक ग्राहकाला www.pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. आपले राज्य आणि वीज वितरण कंपनीची निवड करून त्यानंतर हे करावे लागेल. राष्ट्रीय पोर्टल, संबंधित कुटुंबांना सौर संचाचा  योग्य आकार, फायदे मोजणारी यंत्रणा, विक्रेता क्रमवारी इ. सारखी संबंधित माहिती प्रदान करून मदत करेल. ग्राहकांना विक्रेत्याची आणि आपल्या घराच्या छतावर बसवण्यासाठी विशिष्ट बनावटीच्या सौर ऊर्जा संचाची  निवड करता येईल.

सौर ऊर्जा संचासाठी ग्राहक कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकतो का?

होय. 3 किलोवॅट पर्यंतची निवासी आरटीएस प्रणाली बसवण्यासाठी कुटुंबांना सध्या सुमारे 7% तारण-मुक्त कमी व्याजाचे कर्ज मिळवता येईल. भारतीय रिझर्व बँकेने वेळोवेळी ठरवलेल्या प्रचलित रेपो दरापेक्षा 0.5% अधिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. रेपो दर, जो सध्या 6.5% आहे, तो 5.5% इतका कमी झाला, तर ग्राहकांसाठी प्रभावी व्याजदर सध्याच्या 7% ऐवजी 6% इतका राहील.

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रक्रियेच्या पायऱ्या कोणत्या?

1 ली पायरी

• पोर्टलवर पुढील गोष्टींची नोंदणी करा.

• आपले राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.

• आपला वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल प्रविष्ट करा.

पायरी 2

• ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा.

• अर्जातील सूचनांनुसार रूफटॉप सौर ऊर्जा प्रणालीसाठी अर्ज करा.

पायरी 3

• व्यवहार्यता मंजूरी मिळाल्यावर, कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच  स्थापित करा.

पायरी 4

• संच  बसवण्याचे काम पूर्ण झाल्यावर, प्लांट बाबतचा तपशील सबमिट (जमा) करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.

पायरी 5

• नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉम (DISCOM) द्वारे तपासणी केल्यानंतर पोर्टलवरून कमिशनिंग (मंजुरी) प्रमाणपत्र तयार केले जाईल.

पायरी 6

• कमिशनिंग अहवाल मिळाल्यावर पोर्टलच्या माध्यमातून बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुमचे अनुदान तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत जमा होईल.

रूफ टॉप सोलर योजनेची निवड का करावी?

साधे अर्थशास्त्र. लाभार्थी  कुटुंबे आपल्या विजेच्या बिलाची बचत करू शकतील तसेच आपल्या जवळची अतिरिक्त वीज डिस्कॉमला  विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतील.

पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना 3 किलोवॅट क्षमतेचे रूफ टॉप सोलर युनिट बसवून महिन्याला 300 युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्या कुटुंबांची वर्षाला अंदाजे 15,000 रुपयांची बचत करण्याचे आश्वासन देते. यामुळे स्वतःची वीज उत्पन्न करणाऱ्या संबंधित कुटुंबांच्या वीज बिलात सुमारे . 1,800 ते 1875 रुपये इतकी बचत होईल.

सौर युनिटला वित्तपुरवठा करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील 610 रुपयांचा ईएमआय (हप्ता) वजा केल्यावरही, दरमहा सुमारे 1,265 रुपये किंवा वर्षाला अंदाजे 15,000 रुपये बचत होईल. कर्ज न घेणाऱ्या कुटुंबांची त्याहूनही अधिक बचत होईल.

नवीकरणीय  ऊर्जेची निवड करून, हरित ग्रहासाठी योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे.

ML/KA/PGB 4 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *