सावधान! भारतात eSIM फसवणुकीत झपाट्याने वाढ: थेट बँक खात्यावर हल्ला

जितेश सावंत
eSIM Frauds Surge: Scammers Hijack Numbers to Rapidly Access Bank Accounts
भारतात डिजिटल तंत्रज्ञान जितकं झपाट्याने प्रगत होत आहे, तितकंच गुन्हेगारही अधिक स्मार्ट होत चालले आहेत. परिणामी, सायबर गुन्हेगारीचं जाळं वेगाने विस्तारत आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या समोर येत असलेला एक नवा आणि धोकादायक प्रकार म्हणजे eSIM फसवणूक.

eSIM म्हणजे काय?
eSIM म्हणजे “embedded SIM”, म्हणजेच मोबाइल डिव्हाइसमध्ये अंतर्भूत असलेली डिजिटल SIM. यामध्ये वेगळं कार्ड घालण्याची गरज नसते. यामुळे वापरकर्ते सहजपणे नेटवर्क प्रोव्हायडर बदलू शकतात आणि eSIM QR कोड स्कॅन करून लगेच सेवा सुरू करू शकतात.
eSIM फसवणूक. पारंपरिक SIM कार्डला पर्याय म्हणून आलेली eSIM ही सुविधा जशी सोयीची आहे, तशीच ती सायबर गुन्हेगारांसाठीही एक संधी ठरत आहे.
या फसवणुकीत स्कॅमर केवळ तुमचा मोबाईल नंबर हायजॅक करून थेट तुमच्या बँक खात्यांमध्ये घुसखोरी करतात, तेही तुम्हाला काही कळायच्या आत. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने एक गंभीर इशारा दिला आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीतून ATM किंवा UPI सुविधा बंद असतानाही पीडितांचे पैसे लंपास केले जात आहेत.
- फसवणुकीची सुरुवात: बनावट कॉल आणि संदेश
(Fraud Begins: Fake Calls and Messages)
eSIM फसवणूक सामान्यतः टेलिकॉम प्रोव्हायडर किंवा बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवणाऱ्या कॉल्स किंवा SMS ने सुरू होते.
पीडिताला सांगितले जाते की, “तुमचं सिम eSIM मध्ये रूपांतरित करायचं आहे, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा” किंवा “हा कोड टाका”.
- एका क्लिकमुळे तुमचे SIM निष्क्रिय
(One Click and Your SIM is Deactivated)
जेव्हा पीडित दिलेल्या लिंकवर क्लिक करतो किंवा कोड टाकतो, तेव्हा त्याचे मूळ SIM निष्क्रिय होते. यानंतर सर्व कॉल, मेसेजेस आणि OTP (One-Time Password) स्कॅमरच्या डिव्हाइसवर वळवले जातात.
यामुळे पीडिताला OTP मिळत नाही, आणि स्कॅमरला बँक अॅक्सेस मिळतो.
- काही मिनिटांत आर्थिक लूट
(Financial Theft in Minutes)
OTP चा वापर करून स्कॅमर तुमचं बँक खाते हॅक करतात, पासवर्ड रीसेट करतात, व्यवहार करतात, आणि काही मिनिटांतच मोठी रक्कम चोरी करतात. ही प्रक्रिया इतकी झपाट्याने घडते की, बळी पडलेल्यांना कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
- नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात अशा प्रमुख गोष्टी
(Key Precautions for Users)
eSIM स्कॅम कसा टाळाल ? खालील गोष्टी लक्षात ठेवा:
अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्स किंवा मेसेजेसना प्रतिसाद देऊ नका.
कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी खात्री करा की ती अधिकृत स्त्रोताची आहे.
KYC माहिती कोणालाही देऊ नका. eSIM अॅक्टिवेशनसाठी नेहमी तुमच्या टेलिकॉम प्रोव्हायडरच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटचा वापर करा.
मोबाईलमध्ये SIM बदलासाठी लॉक वापरा. अचानक फोनवर नेटवर्क जाणं, कॉल्स आणि मेसेजेस येणं थांबणं, ही गंभीर चेतावणीची लक्षणं आहेत.
अशा परिस्थितीत त्वरित तुमच्या बँकेशी आणि टेलिकॉम कंपनीशी संपर्क करा.
Cyber Crime Portal वर तक्रार नोंदवा: https://cybercrime.gov.in
नियामक पातळीवर प्रतिक्रिया
(Regulatory Responses)
काही एजन्सींनी अशा फसवणुकीत वापरले गेलेले संशयित फोन नंबर ब्लॅकलिस्ट केले आहेत. दूरसंचार कंपन्यांना eSIM अॅक्टिवेशन प्रक्रियेमध्ये प्रमाणीकरण कडक करण्याचे निर्देश दिले जात आहेत.
6.कायदेशीर तरतुदी
(Legal Provisions)
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 अंतर्गत खालील कलमे या प्रकारात लागू होतात:
कलम 66C – (Identity Theft)
कलम 66D – (Cheating by Personation)
तुमचा मोबाईल नंबर म्हणजे तुमचं डिजिटल आयडेंटिटी आणि आर्थिक व्यवहारांचं प्रवेशद्वार आहे.
एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचं संपूर्ण बँक खातं स्कॅमरच्या हाती जाऊ शकतं.
तंत्रज्ञानाचा वापर जरूर करा पण माहिती घेऊन, आणि सावधगिरी बाळगूनच.
eSIM हे आधुनिक आणि सोयीचं तंत्रज्ञान असलं, तरी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे त्याचा वापर करताना अधिक दक्षता आवश्यक आहे.
eSIM वापरणाऱ्या प्रत्येकाने ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
कारण – “फसवणुकीपासून बचावासाठी सतर्कताच सर्वात प्रभावी उपाय आहे.
लेखक
सायबर कायदा (Cyber law)/ डेटा संरक्षण कायदा तज्ज्ञ (Data Protection law) / डिजिटल पुरावा तज्ज्ञ (Digital Evidence Specialist)आहेत.
ईमेल: jiteshsawant33@gmail.com
ML/ML/MS