गावखेड्यापर्यंत पोहचवण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर

 गावखेड्यापर्यंत पोहचवण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर

मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक स्तरावर, मंडल स्तरावर , ग्राम स्तरावर पक्षाची संघटनात्मक बांधणी किती झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी विभागीय बैठका घेतल्या जात आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

नवी मुंबईत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर शिबिरात महत्वपूर्ण निर्णय घेतले होते, त्याची अंमलबजावणी करणे, मंडल कमिट्या, बुथ प्रमुखांची सद्य परिस्थिती, ग्राम समित्या, ब्लॉक कार्यकारिणीची माहिती, जिल्ह्यातील संघटनात्मक रिक्त पदे, आगामी सर्व निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीत नावे नोंदवणे वा वगळणे, जिल्हा आणि ब्लॉक काँग्रेसच्या ठराव बुकांच्या तपासणीबाबत सविस्तर चर्चा केली जात आहे. आज कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व विभागातही अशाच पद्धतीने आढावा बैठक घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यात काँग्रेस पक्षाला स्वारस्य नाही. राज्यातील लोक वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने शासकीय रुग्णालयात दररोज मरत आहेत. शेतकरी संकटात सापडला असून राज्यात काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ अशी परिस्थिती असताना सरकार दुष्काळ जाहीर करत नाही. बेरोजगारी , महागाई प्रचंड वाढली आहे, भाजपा राज्यात जनतेला जगणे मुश्कील झाले आहे, महाराष्ट्र अधोगतीला लागला असताना मुख्यमंत्री कोण होणार, मंत्री कोण होणार याची चर्चा केली जात आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे पटोले म्हणाले.

आजच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, कोकण विभागाचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे मुखपत्र ‘जनमानसाची शिदोरी’च्या Needly App चे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

ML/KA/SL

7 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *