या कारणामुळे एलन मस्क यांनी रद्द केले NETFLIX चे सबस्क्रिप्शन

न्यूयॉर्क, दि. ३ : जगप्रसिद्ध उद्योजक आणि टेक्नोलॉजी क्षेत्रातील दिग्गज एलन मस्क यांनी अलीकडेच नेटफ्लिक्सची सदस्यता रद्द केली असून, यामागील कारण म्हणजे नेटफ्लिक्सवरील काही कार्यक्रमांमधून लहान मुलांवर ‘वोक’ आणि ट्रान्सजेंडर विचारधारा लादली जात असल्याचा आरोप. विशेषतः ‘Dead End: Paranormal Park’ या अॅनिमेटेड मालिकेच्या निर्माते हॅमिश स्टील यांनी अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली किर्क यांच्या मृत्यूबाबत केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे वाद निर्माण झाला. स्टील यांनी सोशल मीडियावर किर्कला “नाझी” म्हणत त्याच्या मृत्यूचा उपहास केल्याचा आरोप झाला आहे.
या घटनेनंतर मस्कने मॅट वॅन स्वोल या माजी अणुशास्त्रज्ञाच्या पोस्टला “Same” असे उत्तर देत स्वतःची नेटफ्लिक्स सदस्यता रद्द केल्याचे सूचित केले. वॅन स्वोल यांनी लिहिले होते की, “जर तुम्ही अशा व्यक्तीला कामावर ठेवता जो चार्ली किर्कच्या हत्येचा आनंद साजरा करतो आणि माझ्या मुलांवर ट्रान्सजेंडर विचार लादतो, तर तुम्हाला माझ्याकडून एक पैसाही मिळणार नाही.”
मस्कने यापूर्वीही “वोक माइंड व्हायरस” विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, विशेषतः लिंग ओळख विषयावर. त्यांनी आपल्या मुलीच्या ट्रान्सजेंडर संक्रमणाचा अनुभव सांगत अशा विचारधारेला वैयक्तिक पातळीवर विरोध दर्शवला आहे. Dead End: Paranormal Park मालिकेतील LGBTQ+ पात्रांमुळे ही मालिका टीकेच्या केंद्रस्थानी आली असून, मस्कने स्टीलला “ग्रोमर” असेही संबोधले.
या वादामुळे सोशल मीडियावर “Cancel Netflix” हा ट्रेंड जोरात सुरू झाला असून, अनेक वापरकर्त्यांनी आपली सदस्यता रद्द केल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. नेटफ्लिक्सने अद्याप या वादावर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मात्र, या वादामुळे नेटफ्लिक्सच्या शेअरच्या किंमतीतही काही प्रमाणात घट झाली आहे.
SL/ML/SL 3 Oct. 2025