मुंबईत होणार समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वीज उत्पादनाचे नवनवीन पर्याय शोधले जात आहेत. सध्या सौरऊर्जेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यावर भर दिला जात आहे. परंतु सूर्यास्तानंतर सौर उर्जेची उत्पादनक्षमता कमी होते. त्यामुळेच आता समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत समुद्रांच्या लाटांपासून वीजनिर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेड (बीपीसीएल) हा प्रकल्प सुरु करणार आहे. त्यासाठी इस्त्रायलच्या कंपनीचे सहकार्य घेण्यात येणार आहे. समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मितीची देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट मुंबईत होत आहे.
दिल्लीत ‘इंडिया एनर्जी वीक’ (IEW) कार्यक्रम झाला. त्यात देशाच्या वाढत्या इंधन आणि ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या अंतर्गत बीपीसीएलने मुंबई महासागरासारख्या समुद्र किनारी अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज निर्मितीचे नियोजन केले आहे.
बीपीसीएल आणि इस्त्रायलची इको वेव पॉवर या कंपनीत समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती प्रकल्पाबाबत करार होणार आहे. मुंबईच्या समुद्र किनारी 100 किलोवॅट वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. इस्त्रायलमध्ये इको पॉवर कंपनीने हा प्रकल्प यशस्वी केला आहे. यासंदर्भातील करारावर या आठवड्यात हस्ताक्षर होण्याची शक्यता केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
SL/ML/SL
15 Feb. 2025