विधान परिषद सभापती पदासाठीची निवडणूक याच आठवड्यात

नागपूर, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या विधान परिषद सभापती पदासाठी याच आठवड्यात १९ तारखेला निवडणूक घेण्यात येईल असे आज जाहीर करण्यात आले. आज कामकाजाला दुपारी 12 वाजता सुरूवात झाली त्यावेळी सभापती निवडणुकीबाबत राज्यपालांचा संदेश सभागृहातील सदस्यांना उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी वाचून दाखविला.
गेल्या दोन वर्षांपासून या सभागृहाचे सभापती पद रिक्त आहे, रामराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर या पदावर कोणीही आलेले नाही. डॉ गोऱ्हे यांच्याकडेच या सभागृहाची जबाबदारी आहे. या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकीमुळे हे पद भरले जाणार आहे.
या पदासाठी शिवसेनेच्या वतीने दावा करण्यात आला होता, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात गृहखात्या सोबतच हे पद ही मागितले होते, मात्र भाजपाने या दोन्ही मागण्या नाकारल्या असून सभापती पद आपल्याकडेच राहील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाला संधी मिळेल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ML/ML/SL
17 Dec. 2024