29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी

मुंबई, दि. १५ : बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

सह्याद्री अतिथिगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या आधीन राहून राबविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही.

राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थे
संदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
महानगरपालिकांची नावे
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत.

5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी:

छत्रपती संभाजीनगर: 27 एप्रिल 2020, नवी मुंबई: 07 मे 2020, वसई- विरार: 28 जून 2020, कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020, कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020, नागपूर: 04 मार्च 2022, बृहन्मुंबई: 07 मार्च 2022, सोलापूर: 07 मार्च 2022, अमरावती: 08 मार्च 2022, अकोला: 08 मार्च 2022, नाशिक: 13 मार्च 2022, पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022, पुणे: 14 मार्च 2022, उल्हासनगर: 04 एप्रिल 2022, ठाणे: 05 एप्रिल 2022, चंद्रपूर: 29 एप्रिल 2022, परभणी: 15 मे 2022, लातूर: 21 मे 2022, भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022, मालेगाव: 13 जून 2022, पनवेल: 9 जुलै 2022, मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022, नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022, सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023, जळगाव: 17 सप्टेंबर 2023, अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023, धुळे: 30 डिसेंबर 2023, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.

बहुसदस्यीय पद्धत

बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.

नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

‘जातवैधता पडताळणी’बाबत
राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल.

मतदान केंद्र आणि ईव्हीएम

महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

संभाव्य दुबार मतदारांबाबत दक्षता

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी 20 डिसेंबर 2025 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे.

महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल.

त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
‘मताधिकार’ मोबाईल ॲप
महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. या ॲपद्वारे मतदाराचे नाव शोधण्यासाठी मतदाराला दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल.

त्यानंतर जिल्हा आणि महानगरपालिकेच्या नावाची निवड केल्यानंतर आपले नाव दिसेल. याच ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्राचे ठिकाणही कळू शकेल. त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवाराविषयी अधिक माहितीदेखील जाणून घेता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे. त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून ॲपप्रमाणे ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल.

मतदार जागृती

महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्याप्रमाणावर मतदार जागृती करण्याचे आदेश सर्व महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत. पारंपरिक प्रसारमाध्यमांबरोबरच नवीन माध्यमांचा कौशल्यपूर्ण वापर करण्याबाबत आयोगाने 12 जून 2025 रोजी पत्राद्वारे सर्वांना निर्देश दिले आहेत. त्याबाबत वेळोवेळी आढावाही घेण्यात आला आहे. मतदार जागृतीसंदर्भातील सर्व सूचना व निर्देश मार्गदर्शक स्वरुपात असून, स्थानिक पातळीवर काही नावीन्यपूर्ण उपक्रम सूचल्यास तेही आपापल्या स्तरावर राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पातळीवरूनही समाजमाध्यमांसह विविध माध्यमांसह विविध माध्यमांद्वारे मतदार जागृती करण्याचा प्रयत्न असेल. विशेषत: बृहन्मुंबईसह मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अधिक प्रमाणात मतदार जागृतीवर भर देण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने महानगरपालिका स्तरावर नियोजन केले जाईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.

मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल दूरध्वनी नेण्यास बंदी असेल.
मनुष्यबळाची व्यवस्था
महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सुमारे 290 निवडणूक निर्णय अधिकारी आणि सुमारे 870 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आवश्यकता असून, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. साधारणत: सुमारे 1 लाख 96 हजार 605 इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व महानगरपालिका आयुक्त यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम ‘27अअ’ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) अन्वये महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचारावर निर्बंध असतात. त्यामुळे 15 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची वेळ संपत असल्याने 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल. त्यामुळे 14 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.30 नंतर जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारणसुद्धा करता येणार नाही.

माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती

महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच संबंधित महानगरपालिका आयुक्त आपल्या स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ नुसार ‘महानगरपालिकास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ स्थापन करतील. महानगरपालिका आयुक्त स्वत: या समितीचे अध्यक्ष; तर महानगरपालिकेचा जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असेल. ही समिती प्रचारविषयक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेड न्यूजसंदर्भातील तक्रारी/ प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण; तसेच विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि देखरेख करेल. राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ कार्यरत असेल.

प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रवेशिका

राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ च्या परिच्छेद 20 नुसार संबंधित महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावरून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे आणि मतमोजणी केंद्रावरील प्रवेशासाठी प्रवेशिका दिल्या जातील. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्याच स्तरावरून प्रवेशिका देण्यात येतील.

राजकीय पक्षांशी वेळोवेळी संवाद

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी राजकीय पक्षांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आतापर्यंत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठका 14 ऑक्टोबर 2025, 01 डिसेंबर 2025 आणि 12 डिसेंबर 2025 रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बहुसदस्यीय पद्धत, विविध न्यायालयांचे आदेश, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था, ईव्हीएमसाठीच्या स्ट्राँग रूमची निगराणी इत्यादींबाबत बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना अवगत करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करावयाच्या ‘जोडपत्र- 1’ आणि ‘जोडपत्र-2’ बाबत अधिक स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्य प्रचारकांची (स्टार कॅम्पेनर) संख्या 20 वरून 40 करण्यात आली आहे.

मतदार व मतदान केंद्र

• पुरुष मतदार- 1,81,93,666
• महिला मतदार- 1,66,79,755
• इतर मतदार- 4,596
• एकूण मतदार- 3,48,78,017
• एकूण मतदान केंद्र- 39,147

जागा व आरक्षित जागा

• महानगरपालिकांची संख्या- 29
• एकूण प्रभाग-893
• एकूण जागा- 2,869
• महिलांसाठी जागा- 1,442
• अनुसूचित जातींसाठी जागा- 341
• अनुसूचित जमातींसाठी जागा- 77
• नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 759
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा
• बृहन्मुंबई आणि ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे व नागपूर)- रु. 15,00,000/-
• ‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक व ठाणे) – रु. 13,00,000/-
• ‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुबई, छ. संभाजीनगर व वसई-विरार)- रु. 11,00,000/-
• ‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व 19)- रु. 09,00,000/-
महत्वाच्या तारखा
• नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
• नामनिर्देशनपत्रांची छाननी – 31 डिसेंबर 2025
• उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026
• निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026
• अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
• मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026
• मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026

ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *