नव्या मुख्यमंत्र्यांबाबत नरेंद्र मोदी यांचा निर्णय मान्य, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार

महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपाच्या वतीने स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेची भाषा सौम्य झाली. त्यानंतर बुधवार, २७ जानेवारीला ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले, मी स्वतः मोदींना मी फोन केला होता, फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना माझी अडचण असेल असं कधीही मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षे संधी दिली. या राज्याचा विकास करण्याकरता.. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय घ्या. महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असेल तसा आमच्यासाठीही अंतिम असेल. माझी अडचण नसेल. मी काल मोदींना, अमित शाहांना फोन केला. माझ्या भावना सांगितल्या. सरकार बनवताना माझा कोणताही अडसर नसणार हे मी सांगितलं आहे.त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री भाजपचे असतील हे आता उघड झाले आहे.