एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

 एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या कडे सुपूर्द केला. राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेसाठी हा राजीनामा देण्यात आला आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे यांना कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून काम करण्याच्या सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, दादा भुसे आदी यावेळी उपस्थित होते.

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपत आहे. त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक होते. पण अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झालं आहे. राजभवनावर जाऊन एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे.सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. भाजपाला सर्वाधिक १३२ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला ५७ आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारांच्या ४ अशा ६१ जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे मुख्यमंत्रीपद ठरवले जाईल कि शिंदेच मुख्यमंत्री राहतील हे येत्या काही काळात कळेलच. उपमुख्यमंत्रीपद दोघांना मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *