एकनाथ शिंदे पुन्हा आजारी, अजित पवार एकटेच दिल्लीत
 
					
    मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 5 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल असे एकीकडे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेले असतानाच दुसरीकडे आजपासून सुरू होणारी महायुतीतील मंत्रिमंडळ जागावाटप
संदर्भातील बैठक होऊ शकलेली नाही.मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा आजारी पडल्याने त्यांनी आजच्या सर्व गाठीभेटी रद्द केल्या असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आज सायंकाळी उशिराने दिल्लीला एकटेच रवाना झाले असून तिथे ते अमित शहा यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.
23 तारखेला राज्य विधानसभेचा निवडणूक निकाल लागल्यानंतर आणि राज्यात महायुतीला तब्बल दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापने संदर्भातील अडथळ्यांची शर्यत सुरू झाली ती अद्याप संपलेली नाही . आधी मुख्यमंत्री पदावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांनी नंतर तो दावा सोडून गृहमंत्री पद आणि विधान परिषदेचे सभापती पद मिळवण्याचा हट्ट धरल्याचे समजले होते. त्यासोबतच ते आपल्या मूळ गावी निघून गेल्याने आणि तिथे आजारी पडल्याने मधल्या काळातील राजकीय चर्चा पूर्णतः ठप्प झाली होती.
काल सायंकाळी ते मुंबईत परतल्यानंतर थेट आपल्या ठाण्यातील निवासस्थानी गेले असून आजही ते घराबाहेर पडलेले नाहीत. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना देखील भेट दिलेली नाही आणि दिवसभरातील सर्व गाठीभेटी रद्द केलेल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्याचे समजते. दरम्यान उपमुख्यमंत्री पदा संदर्भात आपल्या नावाची चर्चा ही गैर असून आपण पक्ष बांधणीसाठी केंद्रातील मंत्रिपद ही नाकारले होते असा खुलासा खासदार श्रीकांत शिंदे यांनी समाज माध्यमातून केला आहे.
महायुतीतील मंत्रिमंडळाचे खातेवाटप आणि मंत्र्यांची प्रत्येक पक्षाला येणारी संख्या यासाठी आजपासून तिन्ही प्रमुख नेत्यांच्या बैठका होणे अपेक्षित होते, मात्र आज या संदर्भात कोणत्याही बैठका झाल्या नाहीत. तिकडे सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपातील मंत्रिमंडळात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांची रीघ लागली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे आज सायंकाळी उशिरा दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यासाठी गेल्याचे समजले आहे. मंत्रिमंडळात सामील होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचा आढावा शहा घेणार असून त्यांनी प्रत्येक पक्षाकडून इच्छुक नेत्यांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी यादी मागवल्याचे देखील बोलले जात आहे.
ML/ML/PGB
2 Dec 2024
 
                             
                                     
                                    