राज्यातील सत्तासंघर्ष निकाल याच आठवड्यात
मुंबई, दि. 7(एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सत्तासंघर्ष निकाल याच आठवड्यात येण्याची शक्यता असून तो नेमका काय असेल याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.शिवसेनेत पडलेली उभी फूट , आमदारांनी झुगारलेले उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व , त्यांचे राज्याबाहेर जाणे , विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी बजावलेल्या नोटीसा , शिंदे गटाचा प्रतोद बदल , ठाकरे गटाच्या नोटीसा , त्यानंतरचा सत्ताबदल , नवीन विधानसभा अध्यक्ष निवड आदी सर्व बाबींवर सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे.हे प्रकरण सध्या पाच न्यायाधीशांच्या घटना पिठासमोर असून ते सात जणांच्या असावे अशी ठाकरे गटाची मागणी आहे. त्यामुळे त्यावरही निकाल अपेक्षित आहे. याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रते बाबत काय होते हेही या निकालात अपेक्षित आहे.राज्यात झालेल्या या सत्ता संघर्षाला दहा महिन्यांहून अधिक काळ झाला असला तरी तो कायदेशीररीत्या योग्य की अयोग्य ते अद्याप स्पष्ट झालेले नाही, सध्याच्या पाच जणांच्या घटना पिठातील न्या एम आर शहा हे येत्या पंधरा मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्याआधी हा निकाल येणे अपेक्षित आहे, अन्यथा यावर नवीन न्यायाधीशांसमोर पुन्हा सुनावणी घ्यावी लागेल असे कायदे तज्ञांचे मत आहे.
ML/KA/PGB 7 May 2023