एकनाथ षष्ठीचा सोहळा – लाखो भाविकांची उपस्थिती

पैठण ( छ. संभाजीनगर ) दि २० -: संत एकनाथ महाराजांच्या समाधी दिनानिमित्त फाल्गुन वद्य षष्ठी हा दिवस महाराष्ट्रात भक्तिभावाने साजरा केला जातो. विशेषतः पैठणमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. यंदाही लाखोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून संत एकनाथ महाराजांच्या समाधीला अभिवादन केले.
पंढरपूरच्या आषाढी वारीनंतर वारकरी संप्रदायातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सोहळ्यात यंदा विविध ठिकाणांहून ४७५ दिंड्या सहभागी झाल्या होत्या. “भानुदास-एकनाथ” च्या गजरात पैठण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, कोकण, मुंबईसह कर्नाटक, गुजरात आणि इतर राज्यांतील भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.