नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन

मुंबई दि १: अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीस देण्याचं जाहीर केलं आहे.
कृषी विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदशानाखाली एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कृषी विभाग गट अ ते ड श्रेणी मध्ये कार्यरत असलेल्या एकूण 23,959 अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. या सर्वांचे मिळून एकत्रित सहा कोटी सतरा लाख, पन्नास हजार (6,17,50,000) रुपये हुन अधिक रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीत जमा होणार आहे.
कृषी विभागासह राज्यातील चार कृषी विदयापीठे, महाबीज, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, कृषी विभागाची महामंडळे आणि इतर प्रकल्प यांनी ही एक दिवसाचे वेतन देण्याचे कबूल केलं आहे. तसेच कृषी मंत्री कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनीही त्यांचे एक दिवसाचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना यांच्यासह राज्यातील इतर ही कृषी अधिकारी व कर्मचारी संघटनांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वेतन देण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
“या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्यासाठी मदत होणार असून आज शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात ‘कृषी परिवार’ खऱ्या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नसून, मानवीय दृष्टिकोनातूनही साथ देऊ शकते याचा उत्तम आदर्श विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घालून दिला आहे. तसेच शासनाने 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून उर्वरित जिल्ह्यांना पंचनामे पूर्ण होतील त्याप्रमाणे मदत दिवाळी पूर्वी दिली जाईल.” अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.ML/ML/MS