ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादर

 ऐंशी बाल कलाकारांकडून अयोध्येत श्रीराम चरणी सेवा सादर

अयोध्या/पुणे, ता. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर रचित आणि सुधीर फडके स्वरबध्द केलेले गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पुण्यातील “स्वरतरंग संगीत अकादमी” तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा तसेच अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम होता, असा कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील बाल कलाकारांना लाभला.

दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बाल कलाकारांनी गीतरामायणातील निवडक १६ सुमधुर गाणी सादर केली. त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. साथसंगत व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, ईरा परांजपे, हार्मोनियमवर जयंत साने तथा मालती बेहेरे, तबल्यावर अभिजित जायदे, संतोष वैद्य तर तालवाद्यावर प्रसाद भावे यांनी संगत केली.

कार्यकमास राममंदिर ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे, माधुरी आफळे, एल एँड टी मंदिर बांधकाम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश चव्हाण, या श्रीराम मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थाप्रमुख फुलचंद मिश्रा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. यावेळी बाल कलाकारांचे पालक, महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी श्रीराममंदिराचा पूर्व इतिहास आणि उभारणीसंबंधीचे सादरीकरण करून या प्रकल्पाविषयी सर्व माहिती पालक तसेच भाविकांसमोर सविस्तर मांडली.

याआधी पुण्यात “स्वरतरंग संगीत अकादमी” तर्फे गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयावरील सामुहिक सादरीकरणाचे यशस्वी आयोजन केलेले आहे.

ML/ML/SL

27 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *