शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू आणि तीन महिला जखमी

नांदेड दि ४– नांदेड वसमत रोड वरील एका शेतशिवारामध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदेडच्या – वसमत रोड वरील आलेगाव शिवारात आज सकाळी हा अपघात झाला. या महिला हळद काढणीच्या कामासाठी जात होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज या गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी ट्रॅक्टर ने जात असताना टॅक्टर चालकाला अंदाज न आल्याने हा अपघात घडला. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून वसमत चे आमदार राजेश नवघरे हे देखील तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असल्याची माहिती आहे.
याबाबत महसूल विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंज येथील 10 महिला आणि एक पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव (जि.नांदेड) शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी निघाल्या होत्या. या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील ३ महिला आणि एक पुरुष है सुदैवाने बचावले आल्याची माहिती आहे. तर सात महिलांचा मृत्यू झाला असून आणि तीन महिला जखमी झाल्या आहेत.
दरम्यान, विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे आत ट्रॅक्टर आणि ट्रॉली बुडाल्याचे दिसून येत असून विहीरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली आहे.
यात मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.