मालमत्ता कर थकवणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र पालिकेकडून जप्त

 मालमत्ता कर थकवणाऱ्या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र पालिकेकडून जप्त

मुंबई दि.8(एम एमसी न्यूज नेटवर्क): सातत्याने आवाहन करुन तसेच वारंवार पाठपुरावा करुनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर पालिकेच्या वतीने जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील कला विद्यामंदीर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी या शैक्षणिक संस्थेचे संगणक केंद्र, ‘एफ दक्षिण’ विभागातील न्यू नॅशनल मार्केटचे दोन व्यावसायिक गाळे आणि ‘एस’ विभागातील चारभुजा मार्बल आर्ट या दुकानाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ४ कोटी १३ लाख ८८ हजार ५७७ रुपयांची कर थकबाकी आहे.

पालिकेच्या ‘पी उत्तर’, ‘एफ दक्षिण’ आणि ‘एस’ विभागामधील मालमत्ताधारकांवर काल मुंबई महानगरपालिका अधिनियम-१८८८ च्या कलम २०५ नुसार, जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. ‘पी उत्तर’ विभागातील मालाडस्थित कला विद्यामंदीर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजीकडे ०३ कोटी २८ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यामुळे, पी उत्तर विभागाच्या चमूने या शैक्षणिक संस्थेतील संगणक केंद्र जप्त करून अटकावणीची कारवाई केली.

‘एफ दक्षिण’ विभागातील रफी अहमद किडवाई मार्गावरील न्यू नॅशनल मार्केटकडे ५९ लाख ८८ हजार ५७० रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे, या मार्केटमधील दोन व्यावसायिक गाळ्यांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. तर, ‘एस’ विभागामधील पवईस्थित चारभुजा मार्बल आर्ट या मालमत्तेचे २६ लाख रुपये कर थकीत आहे. त्यामुळे, या मालमत्तेवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. दरम्यान, जप्ती आणि अटकावणीची कारवाई झालेल्या या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालाचा लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता करभरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२४ आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालकेने केले आहे.

SW/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *