शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित…
चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जळगाव येथे पदस्थापना असलेल्या चंद्रपूरच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कल्पना चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यावर त्यांना तात्काळ निलंबित करावे आणि त्यांच्या संपत्तीची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिक्षक आमदार सुधाकर काशीद अडबाले यांनी पावसाळी अधिवेशन २०२४ मध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून केली होती.
आठवडाभरात त्यांचा खुलासा प्राप्त होताच निलंबित करू, असे स्पष्ट उत्तर सभागृहात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार चव्हाण यांना शासन सेवेतून निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकारी वर्गांत खळबळ उडाली आहे. शिक्षकांची विविध प्रकरणे अकारण प्रलंबित ठेवणे, सेवानिवृत्त शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात हलगर्जीपणा आणि अनियमितता करणे, त्यातून कथित आर्थिक लाभ मिळविणे आदी गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
ML/ML/SL
27 August 2024