आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव घटले, देशात मात्र जैसे थे

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खाद्यतेलाच्या गरजेसाठी भारतीय बाजारपेठ मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे. आता आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत मात्र देशांतर्गत बऱ्याच ठिकाणी त्यातुलनेत भाव कमी झालेले नाहीत.
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील सहा महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाली. मागील दोन महिन्यांमध्ये झालेली घट लक्षणीय आहे. पण देशातील खाद्यतेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील दरासोबत कमी झाले नाही. देशातील भूईमूग, मोहरी आणि सोयाबीनचे उत्पादन यंदा विक्रमी होऊनही खाद्यतेलाचे दर कमी झाले नाहीत. सरकार भाव करण्यासाठी उद्योगांना सूचना करत आहे. त्यामुळं सॉल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाएसईएचे अध्यक्ष अजय झूनझूनवाला यांनी आपल्या सदस्यांना खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याचे आवाहन केले आहे.
देशातील काही तेल कंपन्यांनी विक्री किंमत आधीच कमी केली आहे. पण तेलाच्या पाकिटावर नमूद असलेली कमाल विक्री किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील दराप्रमाण कमी झाली नाही. कमाल विक्री किंमत जास्त आहे.
त्यामुळं केंद्री अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं एसईएला सर्व सदस्य़ांच्या तेल विक्रीचा कमाल विक्री भाव समान करण्यास सांगितले आहे. यामुळं सर्व कंपन्यांच्या ग्राहकांना फायदा होईल.
देशात मागील वर्षभरात खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेल दरातील नरमाई जास्त आहे. त्यामुळे देशात खाद्यतेलाचे भाव आणखी कमी व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता उद्योगांच्या संस्थेनेही यासाठी पुढाकार घेतला आहे.