बेटींग प्रकरणी रैना आणि धवनवर ED ची मोठी कारवाई
मुंबई, दि. ६ : : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांना ऑनलाइन बेटिंग प्रकरणात मोठा झटका बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) कारवाई करत दोन्ही खेळाडूंच्या एकूण ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा संबंध 1xBet या बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी आहे. तपासात असे निष्पन्न झाले की रैना आणि धवन यांनी परदेशी कंपन्यांशी जाहिरात आणि प्रमोशनसाठी करार केला होता, ज्याद्वारे त्यांना परदेशी माध्यमांतून पैसे मिळाले. हे उत्पन्न बेकायदेशीर असल्याचे ED च्या तपासात स्पष्ट झाले आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे. या कारवाईमुळे दोन्ही खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसला असून त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी सुरू आहे. ED च्या सूत्रांनी सांगितले की या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे आणि तपास अधिक व्यापक स्वरूपात सुरू आहे.
ही कारवाई भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी ठरली असून खेळाडूंनी जाहिरात करताना कायदेशीर बाबींची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या प्रकरणातून अधोरेखित होते. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
SL/ML/SL