नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ईडीने जप्त केली ७५२ कोटींची मालमत्ता
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल हेराल्ड आर्थिक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ७५२ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे दिल्लीतील आयटीओ परिसरातील कार्यालय, लखनौमधील नेहरू भवन आणि मुंबईतील हेराल्ड हाउस यांचा समावेश आहे.
पाच राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच काँग्रेसशी संबंधित संस्थेवर ही कारवाई झाली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी यापूर्वी गांधी कुटुंबीय, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या इतर काही नेत्यांची मागील वर्षी चौकशी झाली होती. या प्रकरणी आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी या सर्वांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलाविले जाऊ शकते,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘ईडी’ने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियन या संस्थांविरोधात जप्तीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणात ‘एजेएल’ आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना निधी देणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप ‘ईडी’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केला आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ हे वृत्तपत्र ‘एजेएल’कडून प्रकाशित केले जात असून आणि ‘यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडे त्याची मालकी आहे. जप्तीची ही कारवाई तात्पुरती, म्हणजे सहा महिन्यांसाठी असून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ही मालमत्ता पूर्णपणे जप्त करता येऊ शकते.
या कारवाईवर काँग्रेसने टीका केली आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली असून ‘ईडी’ ही संस्था भाजपचा सहकारी पक्ष असल्याप्रमाणे काम करत आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. पाच राज्यांमध्ये पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच भाजपने ही खेळी केल्याचा दावाही काँग्रेसने केला.
SL/KA/SL
22 Nov. 2023