आमदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची छापेमारी

मुंबई दि.9( एम एमसी न्यूज नेटवर्क) : जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी उध्दव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर
यांच्या मातोश्री क्लब आणि घरी आज सकाळपासून ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार रवींद्र वायकर यांनी भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
सदरचे बांधकाम करताना वायकर यांनी मुंबई महानगर पालिकेकडून परवानगी घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. सोमय्या यांनी याबाबत रवींद्र वायकर यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेनं वायकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. वायकर चौकशीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर आता वायकरांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
ML/KA/SL
9 Jan. 2024