#22000 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी ओंकार समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना ईडीकडून अटक
मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईच्या ओंकार ग्रुप बिल्डरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना अटक केली आहे. 22 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार समूहाने सर्व बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. यापैकी 450 कोटी रुपयांचे कर्ज येस बँकेचे आहे. हे कर्ज मुंबईतील झोपडपट्ट्यांच्या जागेवर इमारती बांधण्यासाठी (झोपडपट्टी पुनर्वसन) घेण्यात आले होते. याप्रकरणी ईडीने ओंकार समुहाच्या 10 जागांवर सोमवारी छापा टाकला. ही कारवाई बुधवारपर्यंत सुरु होती.
ओंकार समुहाच्या कार्यालयातून बरीच कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीनंतर बाबूलाल वर्मा आणि कमलनाथ गुप्ता यांना ईडीने बुधवारी दुपारी अटक केली. सूत्रांनी सांगितले की हे दोघेही अधिकार्यांना तपासात सहकार्य करत नव्हते, म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनाही गुरुवारी पीएमएलए न्यायालयात हजर केले जाईल. ओंकार समुहाची चौकशी याआधी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा देखील करत होती. या बिल्डर कंपनीविरोधात 2019 मध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत ओंकार समुह आणि गोल्डन एज समुहाने चुकीची कागदपत्रे सादर करून कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. हे कागदपत्र झोपडपट्ट्यांशी संबंधित होते.
ओंकार ग्रुप हा मुंबईतील बांधकाम क्षेत्रातील एक मोठा समुह आहे. तो प्रामुख्याने प्रीमियम रिअल इस्टेट प्रकल्प विकसित करतो. त्यांचा मुंबईच्या उच्चभ्रू भागात वरळी येथे ओंकार 1973 नावाचा प्रकल्प आहे. यात बरेच उच्चभ्रू ग्राहक आहेत. झोपडपट्ट्यांच्या इमारती बनवणारा हा सर्वात मोठा समुह आहे.
Tag-ED/Omkar Group/Raid
PL/KA/PL/28 JAN 2021