राज्याची आर्थिक स्थिती उत्तम, जीडीपी मध्ये दहा टक्क्यांनी वाढ
मुंबई, दि १(एम एम सी न्यूज नेटवर्क):
राज्याचे स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढले असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत , राजकोषीय तूट २.३२ टक्के इतकी मर्यादित राखली आहे तर दुसरीकडे GST वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिला , काल दिवसभर चाललेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेला ते उत्तर देत होते.राज्याला कर्जासाठी २५ टक्के मर्यादेत कर्ज घेता येतं मात्र सध्या ते १८.०२ टक्के इतक्या मर्यादेतच आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचं GST उत्पन्न १९.०९ टक्क्यांनी वाढलं आहे, या उत्पन्नात देशात राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, देशात राज्याचा वाटा १५.८२ टक्के इतका आहे असं पवार म्हणाले.
या अंतरिम अर्थसंकल्पत कृषी, शालेय शिक्षण, सार्व बांधकाम , आरोग्य , वैद्यकीय शिक्षण, सामाजिक न्याय या खात्यात भरीव वाढ केली आहे असं सांगून उद्योग धंदे वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीत मोठी भर देण्यात आली आहे असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांना मोठी मदत , एक रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान योजनेचा राज्याचा स्वतंत्र हिस्सा , आनंदाचा शिधा, राज्यात सुरु असलेल्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना यावरील खर्च यामुळे गेल्या वर्षभरात पुरवणी मागण्यांवरील रकमेत वाढ करावी लागली असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं.
महानंद डेअरी कोणाच्याही घशात घालण्याचा प्रयत्न नाही , जो कोणी यासाठी उत्तम प्रस्ताव देईल त्याचा सरकार विचार करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.शेतकऱ्यांसाठी विविध योजना , बारा बलुतेदार यांच्यासाठी , घरेलु कामगारांसाठी , अल्पसंख्याक समाज , मातंग समाज यांच्यासाठी महामंडळे स्थापन करून त्यांना भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे असं अजित पवार म्हणाले.यानंतर सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात सामान्यांना न्याय मिळाला नाही याचा निषेध करीत विरोधकांनी सभात्याग केला. यानंतर लगेच सभागृहाने अर्थसंकल्पाला मंजुरी देणारे विधेयक मंजूर केलं.
ML/KA/SL
1 March 2024