पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स एन्व्हायर्न्मेंट प्रोग्रामतर्फे (यूएनईपी) प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. जगभरातील एकूण सहा जणांना पुरस्कार जाहीर झाला असून, त्यात गाडगीळ जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे. सन २००५पासून जनसमूह आणि पृथ्वीच्या संरक्षणासाठी योगदान देणाऱ्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार मानला जातो.
आतापर्यंत १२२ जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ‘माधव गाडगीळ संशोधन आणि सक्रिय लोकसहभागाद्वारे पृथ्वीरक्षणासाठी अनेक दशके झटले आहेत. नैसर्गिक संसाधनांच्या रक्षणावरील जनमत आणि अधिकृत धोरणांवर गाडगीळ यांनी केलेल्या कामांचा मोठा प्रभाव आहे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि जागतिक जैवविविधतेचे अनोखे केंद्र असलेल्या पश्चिम घाट क्षेत्राबाबत केलेल्या अत्यंत कळीच्या कामासाठी गाडगीळ ओळखले जातात,’ असे ‘यूएनईपी’ने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
शास्त्रज्ञ म्हणून मनापासून, वस्तुनिष्ठ पद्धतीने, तर्कशुद्ध मांडणी करत गेलो. मला लोकांमध्ये राहून काम करण्याची आवड आहे. त्यामुळे भारतभरात आदिवासी ठिकाणांपासून अनेक ठिकाणी राहिलो, फिरलो. धोरणात्मक काम करता आले. २०१३मध्ये पश्चिम घाटासंदर्भातील अहवाल लिहिला. आजवरच्या कामाचे चीज होत गेले. पुरस्कार मिळाल्याचा निश्चितच आनंद आहे. – डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ
‘पर्यावरण रक्षणासाठी अव्याहतपणे झटणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ या महाराष्ट्र सुपुत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार मिळणे देश आणि राज्यासाठी अभिमानास्पद – मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
SL/ML/SL
11 Dec. 2024