बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून १२ मालमत्तांची ई-लिलाव कार्यवाही सुरू
मुंबई, दि २४
मालमत्ताकर थकविणा-या मोठ्या थकबाकीदारांविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर पावले उचलत जप्ती व लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमे अंतर्गत महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने काल, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी, एकूण १२ मालमत्तांची जाहीर ई – लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात १० मोकळे भूखंड, १ व्यावसायिक इमारत आणि १ संमिश्र वापराच्या मालमत्तेचा समावेश आहे. मालमत्ता करापोटी या १२ थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण ३७८ कोटी ६३ लाख ६७ हजार ५५७ रुपये इतकी मोठी थकबाकी प्रलंबित आहे. वारंवार नोटीस देऊनही थकीत कर भरणा न केल्याने संबंधित १२ मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव केला जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मालमत्ताकर थकविणाऱ्या आस्थापनांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या स्पष्ट निर्देशांनुसार तसेच सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) श्री. विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (मालमत्ता) श्री. गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी व्यापक आणि नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत.
याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच पश्चिम, एस, आर दक्षिण आणि ई या प्रशासकीय विभागांमधील थकीत कर धारकांच्या मालमत्तांवर अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम २०६ (२) नुसार, लिलावाची नोटीस जारी करण्यात आली आहे. या बारा मालमत्तांची जाहीर ई लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे.
त्यात एच पश्चिम विभागात मेसर्स सुमेर असोसिएट्स यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम १८८ कोटी ४६ लाख २४७ रूपये), एस विभागातील भांडुप येथील मेसर्स राजहंस असोसिएट्स यांच्या नावे असलेली व्यावसायिक इमारत (थकबाकी रक्कम ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार ६८७ रूपये), आर दक्षिण विभागात कांदिवली पूर्व येथील श्री. विठ्ठलराव खापरे यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम ६४ लाख २९ हजार ४६१ रूपये), एच पश्चिम विभागात श्री. रामचंद्र हेमनदास सेतपाल व इतर यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम १० कोटी ४ लाख २७ हजार ८२५ रूपये), ई विभागात रे रोड येथील श्री. मुल्ला गुलाम अली यांच्या नावे असलेले ३ भूखंड (थकबाकी रक्कम ०९ कोटी ३९ लाख १० हजार ६६८ रूपये), (थकबाकी रक्कम ०४ कोटी १५ लाख १९ हजार ८३० रूपये), (थकबाकी रक्कम ८५ कोटी ३८ लाख ७८ हजार १८५ रूपये), एच पश्चिम विभागात खार येथील श्री. पी.के. मोदी यांच्या नावे असलेला भूखंंड (थकबाकी रक्कम २ कोटी १४ लाख ५३ हजार ०४६ रूपये), एच पश्चिम विभागात मेसर्स एल्को आर्केड निवासी आणि बिगरनिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नावे असलेली संमिश्र वापराची मालमत्ता (थकबाकी रक्कम ९ कोटी ७६ लाख २० हजार ३३६ रूपये), श्री. युसूफ अहमद यांच्या नावे असलेला खार पश्चिम येथील भूखंड (थकबाकी रक्कम २ कोटी ४७ लाख ४५ हजार ९९९ रूपये), वांद्रे येथील सहायक पाद्री, सेंट पीटर्स चर्च यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम १२ कोटी ६४ लाख ९८ हजार ७४२ रूपये) आणि सांताक्रुझ पश्चिम येथील श्रीमती हरदेवी पी. राजपाल यांच्या नावे असलेला भूखंड (थकबाकी रक्कम ६ कोटी ४९ लाख ९२ हजार ५३१ रूपये) आदींचा समावेश आहे.
या सर्व थकबाकीदारांना कर भरणा करण्यासाठी २१ दिवसांची दीर्घ नोटीस बजाविण्यात आली आहे. या मुदतीत कर भरणा न केल्यास विहित कार्यपद्धतीनुसार, लिलाव प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
दरम्यान, मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणा-या मोठ्या थकबाकीदारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत आहेत. विहित मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम २०३, २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करुन लिलाव केला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक २५९२ / २०१३ च्या अंतरिम आदेशान्वये जर संबंधित मालमत्तेकडून येणे अपेक्षित कर वसूल न झाल्यास मालमलेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.KK/ML/MS