दिल्लीसह या राज्यांना भूकंपाचा धक्का
नवी दिल्ली,दि.24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रचंड थंडीमुळे गारठलेल्या उत्तर भारताला आज भूकंपाच्या धक्क्याने हादरवून सोडले. दिल्ली – NCRमध्ये आज दुपारी 2.28 वा. 5.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात जवळपास 30 सेकंद जोरदार झटके बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळच्या कालिकाहून 12 किमी अंतरावर होते. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत व चीनपर्यंत जाणवला.
उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले. नववर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राजधानीत भूकंप होण्याची ही तिसरी वेळ आहे. या भूकंपाचा प्रभाव दिल्ली-एनसीआरसह उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश व हरियाणाच्या काही भागात जाणवले.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये 3 फॉल्ट लाइनमध्ये आहेत. जिथे फॉल्ट लाइन असते, तिथेच भूकंपाचे एपिसेंटर असते. दिल्ली – एनसीआरमध्ये जमिनीखाली दिल्ली-मुरादाबाद फॉल्ट लाइन, मथुरा फॉल्ट लाइन व सोहना फॉल्ट लाइन आहे. संशोधकांच्या माहितीनुसार, टेक्टोनिकल प्लेट्समध्ये होणाऱ्या हालचालींमुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.
याशिवाय उल्का प्रभाव व ज्वालामुखी स्फोट, माइन टेस्टिंग व न्यूक्लिअर टेस्टिंगमुळेही भूकंप होतो. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता मोजली जाते. त्यानुसार, 2.0 व 3.0 रिश्टर स्केलचा भूकंप सौम्य मानला जातो. तर 6 तीव्रतेचा भूकंप शक्तिशाली मानला जातो.
आजच्या भूकंपाच्या घटनेमुळे नागरीकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. मात्र या घटनेत किती नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली आहे याची ठोस माहिती आलेली नाही.
SL/KA/SL
24 Jan. 2023