हक्काच्या रोजगारासाठी चला एकनाथ मामाच्या गावाला…

ठाणे, दि ९
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवुन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो युवावर्गाला हक्काच्या कायम रोजगाराचा आशेचा किरण दाखवला. मात्र, ११ महिने प्रक्षिणार्थी म्हणुन काम केल्यानंतर युवाशक्ती पुन्हा बेरोजगार झाली असुन महायुती सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. या विरोधात राज्यभरात आजवर १३ आंदोलने करण्यात आली, तरीही सरकारला जाग येत नसल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना आक्रमक बनली असुन येत्या १२ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील – चाकुरकर यांनी गुरुवारी ठाण्यातील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात पार पडलेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजने पाठोपाठ युवावर्गासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना राबवली. तसेच, १० लाख युवांना शैक्षणिक अर्हतेनुसार प्रतीमाह ६ हजार व १० हजार मानधन देण्यासोबतच त्याच आस्थापनेत कायम करणार असल्याचे आश्वासित केले होते. त्यानुसार या योजनेत विविध सरकारी आस्थापनामध्ये काम केलेले तब्बल १ लाख ७५ हजार प्रक्षिणार्थी आजघडीला प्रशिक्षित बेरोजगार बनले आहेत. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले असुन लाडक्या बहिणीच्या भावाने अर्थात एकनाथ मामाने एक प्रकारे आपल्या भाचा – भाचींना फसवल्याचा आरोप चाकुरकर यांनी केला. तेव्हा, या बेरोजगार प्रशिक्षणार्थीना कायमस्वरूपी रोजगार देऊन मानधनात दुप्पट वाढ करावी. रोजगार हमीच्या धर्तीवर कायमस्वरूपी रोजगाराची हमी देणारा कायदा येणाऱ्या अधिवेशनात करावा. आदी मागण्यांसाठी रविवारी (ता.१२ ऑक्टो.) ३६ जिल्हयातील हजारो प्रशिक्षणार्थी बेरोजगार “चला एकनाथ मामाच्या गावाला जाऊया” आंदोलन छेडून एकनाथ मामाच्या ठाण्यातील घरासमोर काळी दिवाळी साजरी करणार असल्याचा इशारा बालाजी पाटील – चाकुरकर यांनी दिला आहे.AG/ML/MS