मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार, नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून 19 फेब्रुवारी रोजी ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या निवड समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. मात्र ज्ञानेश कुमार यांची ही निवड आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विशेषतः निवडणूक आयोगाच्या तटस्थतेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या काँग्रेस पक्षाकडून या निवड प्रक्रियेवर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या निवडणूक निवड़ समितीच्या बैठकीनंतर ही नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन मुख्य निवडणूक आयुक्त पदासाठी 5 नावांची यादी देण्यात आली होती. पण राहुल यांनी नावांचा विचार करण्यास नकार दिला होता. बैठकीनंतर राहुल गांधी यांनी एक असहमती पत्र जारी केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे ही बैठक होऊ नये.
सर्वोच्च न्यायालय या शनिवारी नवीन नियुक्ती प्रक्रियेविरुद्धच्या आव्हानावर सुनावणी करणार आहे, कारण याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की 2023 मध्ये भारताच्या सरन्यायाधीशांना निवड समितीमधून काढून टाकणे आणि त्यांच्या जागी कॅबिनेट मंत्री नियुक्त करणे- आयोगाच्या स्वातंत्र्याशी तडजोड करते.