दुष्काळी भागात पिकत आहेत काश्मिरी सफरचंद…..
जालना दि १९– जिल्ह्यातील घनसावंगी तालुका हा दुष्काळी पट्यात येतो.त्यामुळे पारंपरिक शेतीतही नुकसानीत राहणारे शेतकरी या दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमीत कमी पाण्यात कुठली पिके घेतात याची माहिती घेत आता आधुनिक शेतीकडे वळू लागली आहेत. नोकरीच्या निमित्ताने घनसावंगी येथे स्थायिक झालेले शेतकरी महादेव सुपेकर आणि त्यांची पत्नी या दोघांनी शेतीत अभिनव प्रयोग करून सफरचंदाची शेती फुलवली आहे.त्यांनी चक्क हिमाचल प्रदेशातून मागवलेली सफरचंदाची साडे ३ एकरवर लागवड करून सफरचंदाची शेती फुलवली आहे.
दुष्काळी पटय्यातील शेतकरी महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये ४ वर्षांपूर्वी अनोखा प्रयोग केला तेंव्हा परिसरातील शेतकरी त्यांना हसायचे.या भागात हे पीक येत नाही,उगाच स्वतःच नुकसान करून घेतलं असं बोलायचे.गेल्यावर्षी या बागेत पहिला बहार आला तेंव्हा मात्र लोकांचा या पिकाकडे बघायचं दृष्टिकोन बदलला. यावर्षी तर सफरचंदाची लालचुटुक बाग बहारल्याने सुपेकर दाम्पत्य आनंदी आहे.
शेतकरी महादेव सुपेकर हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राहतात. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे. मात्र शासकीय नोकरीच्या निमित्ताने ते घनसावंगी येथे स्थायिक झाले.इथे शेती घेऊन त्यांनी शेतीत काही नवीन करता येईल का यावर विचार सुरू केला आणि आवड म्हणून शेतीत रमले.
सात वर्षांपूर्वी सुपेकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळील मुखराई या ठिकाणी अभिजित धुमाळ यांच्या सफरचंदाच्या शेतीला भेट दिली होती.तो यशस्वी प्रयोग पाहून काश्मीर, हिमाचल प्रदेशात पिकणारे सफरचंद आपल्या शेतीत पण पिकू शकते हा ध्यास मनात धरून त्यांनी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला. उष्ण प्रदेशात कमी पाण्यात सफरचंदाची शेती होऊ शकते याची माहिती घेत त्यांनी
साडे ३ एकरावर सफरचंद ची लावगड करण्याचा निर्णय घेतल्याचे सुपेकर सांगतात.
निर्णय पक्का झाल्यावर माहिती घेत त्यानी हर्मन 99 या जातीची १ हजार रोपे कुरियर ने हरिद्वार ते छत्रपती संभाजी नगर पर्यंत विमानाने आणली.
तिथून कारमध्ये ही रोपे घनसावंगी पर्यंत आणली.या सर्व वाहतुकीसह त्यांना सफरचंदाचे १ रोप पडले होते २१८ रुपयांना,आणि ड्रिप वगैरेचा खर्च पकडून ३ लाखांचा खर्च झाला होता.
हिमाचल प्रदेशातून मागवलेली १ हजार रोपांची सुपेकर यांनी साडेतीन एकर क्षेत्रात १२ बाय १२ फुटांच्या अंतरावर लागवड केली. या रोपांना पाण्याची फारशी आश्यकता नाही,पण शेततळ्यात साठवून ठेवलेल्या पाण्याची मदत पावसाळ्यानंतर घेऊन पाण्याचे नियोजन केले आहे.तसेच हलक्या प्रतीची जमीन आवश्यक असल्याने सुपेकर यांनी शेतीचे योग्य नियोजन केल्याने तिसऱ्या वर्षी या रोपांना पहिला बहार येऊन सफरचंद लगडण्यास सुरुवात झाली. या चौथ्या वर्षी सगळी बाग सफरचंदाची बाग बहरली असून लालचुटुक सफरचंदे झाडावर लगडली असून येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सध्या सफरचंदाची झाडे फळाने लगडली असून बागेतून २०० ते २५० कॅरेट सफरचंदाचे उत्पन्न निघण्याची अपेक्षा असून त्यातून ८ लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा सुपेकर दाम्पत्य व्यक्त करतात. नोकरीतून जास्त वेळ मिळत नसल्याने या बागेची सर्व काळजी त्यांची पत्नी सुषमा सुपेकर यांनी घेतली आहे. घरदार सांभाळून त्या सफरचंदाच्या शेतीत राबल्या. पिकांची योग्य काळजी घेतली. एकही मजूर न लावता या दांपत्याने मेहनतीतून दुष्काळी भागात सफरचंदाची शेती फुलवली. ड्युटीच्या वेळेच्या आधी आणि ड्युटी संपल्यावर मिळेल तो सगळा वेळ सुपेकर पत्नी सुषमा यांच्यासह शेतीलाच देतात.पारंपारिक पिकांमधून शेतकऱ्यांच्या हाती फारसे उत्पन्न येत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात कमी आवक असलेल्या फळांची लागवड करावी,त्याला चांगला दर मिळून चांगले उत्पन्न मिळू शकते.
त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेती सोबत किमान १००/२०० झाडांची लागवड करण्याचे आवाहन सुपेकर करतात. या यशस्वी प्रयोगाने भारावलेल्या या दांपत्याने आता याच शेतीत ड्रॅगन फ्रूट आणि खजूर शेती करण्याचा निर्णय घेतला असून इंच न इंच जमिनीचा उपयोग करण्याचं ठरल्याचं हे दांपत्य सांगतं.
ML/ML/PGB 19 APR 2024