दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश
मुंबई, दि ३
मुंबईकरांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही नागरिकांना दररोज पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमितपणे करीत असते. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा विविध स्तरावर वेळोवेळी गौरव देखील करण्यात आला आहे. तथापि, सध्या काही ठिकाणांहून पाणी पुरवठयाबाबतच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींचे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित निराकरण करावे आणि पाणीविषयक सर्वच तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांचा निपटारा योग्य वेळेतच करावा. त्यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने आणि सर्वोच्य प्राधान्याने निपटारा करावा, असे सुस्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. तसेच जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पथके तैनात करावीत, असेही निर्देश श्री. बांगर यांनी गुरुवारी सायंकाळी आयोजित जल अभियंता खात्याच्या एका विशेष आढावा बैठकीदरम्यान दिले आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विनाविलंब स्थळ पाहणी करावी. या पाहणी दरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्यास विनाविलंब योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात. या उपाययोजनांमध्ये आवश्यक तेथे पाणीपुरवठ्याच्या सध्याच्या वितरण यंत्रणेमध्ये काही बदल केल्यामुळे काही मार्ग निघू शकतो. उदाहरणार्थ पाणीपुरवठ्याच्या ‘झोनिंग’ पद्धतीमध्ये योग्य त्या सुधारणा करणे, एखाद्या जलवाहिनीवर गळती उद्भवली असल्यास ही विनाविलंब दुरुस्त करणे, तर काही ठिकाणी व्यवस्थेमध्ये संरचनात्मक बदल करणे; आवश्यकतेनुसार अतिरिक्त ‘बूस्टिंग’ विनाविलंब करणे; यासारख्या बाबींचा उपाययोजनांमध्ये समावेश करता येईल.
वरीलनुसार अपु-या पाणीपुरवठ्याबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करावे. शक्यतो लोकप्रतिनिधींच्या सोबत पाहणी दौरे करावेत, जेणेकरून त्यांच्याकडून जी माहिती मिळणे अपेक्षित आहे, ती माहिती थेटपणे मिळू शकेल, अशाही सूचना श्री. बांगर यांनी आढावा बैठकीदरम्यान दिल्या.
आढवा बैठकीदरम्यान दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत देखील सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत श्री. बांगर यांनी आदेशित केले की, दूषित पाण्याबाबतची तक्रार ही अत्यंत गांभीर्याने घेतली जावी. या तक्रारींबाबत कार्यवाही करताना कमालीची तत्परता (Extreme Urgency) दिसणे आवश्यक आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींबाबत विना विलंब कार्यवाही झाली नाही, तर त्याचा परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतो, या बाबींची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच याबाबत सर्व यंत्रणांनी अत्यंत संवेदनशील राहणे गरजेचे आहे, अशाही सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याच बैठकीदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले की, दूषित पाण्याचा उगम शोधण्याची कार्यवाही विना विलंब व ‘२४ × ७’ पद्धतीने कोणताही खंड न पडता करावी. ही कार्यवाही करताना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे. दूषित पाण्याच्या तक्रारींचा योग्य वेळेत निपटारा करण्यासाठी विशेष पथके गठीत करण्यात यावीत. ही पथके परिमंडळनिहाय उपलब्ध करून द्यावीत. जेणेकरून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत विनाविलंब कार्यवाही करता येऊ शकेल. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक असेल तर तशी विभागाने मागणी करावी. त्यानुसार मनुष्यबळ प्राधान्याने उपलब्ध करून दिले जाईल.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागातील पाणी पुरवठा, बांधकाम, नियोजन आणि परिरक्षण या प्रमुख उपविभागांनी एकमेकांशी नियमितपणे संवाद ठेवणे गरजेचे आहे. तसेच या अनुषंगाने जल अभियंता विभागातील उपविभागांचा एकमेकांशी नियमित सुसंवाद राहील; याची सुनिश्चिती जल अभियंता यांनी करावयाची असून याबाबत आवश्यक ती दक्षता घ्यावयाची आहे.
पाणीपुरवठा विषयक प्रकल्प हे विहित वेळेत पूर्ण होण्यास अडचणी येत असतील, तर अभियंत्यांना आवश्यकतेनुसार सहकार्य व मदत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जावी. तसेच या अनुषंगाने कुणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर याबाबत जबाबदारी निश्चित करण्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी; असेही श्री. बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान नमूद केले.
जल अभियंता खात्याच्या या बैठकीदरम्यान उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देशित करताना श्री, बांगर म्हणाले की, लवकरच पाणीपुरवठ्याच्या नियोजनाचा प्रभाग निहाय आढावा घेतला जाईल. या पार्श्वभूमीवर त्या – त्या विभागातील सहाय्यक अभियंता (जलकामे) यांनी आपापल्या कार्यक्षेत्राचा आणि कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांचा आढावा घ्यावा व त्याबाबत आढावा बैठकीदरम्यान सादरीकरण करावे.
बृहन्मुंबई महानगर परिसरात महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत रस्ते विकासासह इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या काही ठिकाणी स्थानांतरीत कराव्या लागतात, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. यामुळे संबंधित परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित होऊ शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास सदर परिसरातील जलवाहिन्यांची तातडीने दुरूस्ती करावी, अगर आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकाव्यात. ही सर्व कामे करत असताना जल अभियंता खात्यातील विविध उपविभागांसोबतच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांशी आणि मुंबईतील विविध प्राधिकरणांशी सुयोग्य समन्वय साधून लवकरात लवकर सदर कामे पूर्ण करावीत. जेणेकरून रस्त्यांची कामेदेखील निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही श्री. बांगर यांनी आजच्या बैठकीदरम्यान आवर्जून आदेशित केले.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सध्या प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे, उन्हाळ्यात वाढणारी पाण्याची गरज आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याची एक विशेष आढावा बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरूषोत्तम माळवदे, जल अभियंता दिलीप पाटील यांच्यासह जल अभियंता खात्यातील संबंधित वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित होते.JS/ML/MS