नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार

नाशिक, दि. १ : येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत.
करन्सी नोट प्रेसमध्ये कनिष्ठ टेक्निशियन (मुद्रण/नियंत्रण), कनिष्ठ टेक्निशियन (कार्यशाळा/इलेक्ट्रीकल) आणि पर्यवेक्षक या पदांसाठी 13 मार्च 2022 ते 4 मार्च 2023 या कालावधीत भरती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत सात जणांनी संगनमत करून डमी परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पाठवले. या डमी उमेदवारांनी त्यांच्या जागी परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाले.
परीक्षा पास झाल्यानंतर, आरोपींनी बनावट आयटीआय प्रमाणपत्रे आणि विद्युत अभियांत्रिकीतील (इलेक्ट्रीकल) डिप्लोमाची बनावट कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवली. या फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आल्यानंतर प्रकरण झिरो एफआयआरच्या स्वरूपात मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
सर्व आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस विविध राज्यांत शोधमोहीम राबवत आहेत. पवई पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्याचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा किंवा रॅकेटचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.