‘रेमल’ चक्रीवादळाच्या तडाख्याने प. बंगालमध्ये उलथापालथ

 ‘रेमल’ चक्रीवादळाच्या तडाख्याने प. बंगालमध्ये उलथापालथ

कोलकाता, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात रविवारी रात्री दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. या वादळामुळे सर्वत्र झाडे कोसळली असून रस्त्यांवर पाणी साचलं आहे. पश्चिम बंगालमधील वाहतूक सेवाही यामुळे विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगालमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. रविवारी रात्री कोलकाता शहरात १४० मिमी. पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

रविवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात वाहतूक सेवाही विस्कळीत असून काही रेल्ले गाड्या करण्यात आल्या आहेत. तसेच मेट्रो सेवाही स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. खराब हवामानाचा फटका हवाई वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. या वादळामुळे कोलकाता विमानतळावरील काही उड्डाणे रविवारी दुपारपासूनच स्थगित करण्यात आली होती. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे आज सकाळी ९ वाजतापासून विमान सेवा पुन्हा सुरु करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत या चक्रीवादळाची तीव्रता कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याशिवाय हवामान विभागाकडून राज्यातील मुर्शिदाबाद आणि नादिया या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये सोमवारी ७ ते २० सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोलकात्यासह आठ जिल्ह्यांमध्ये ३० ते ६० किमी प्रतितास वेगाने गडगडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम बंगाल सरकारने किनारपट्टी भागाप्रमाणेच सागर बेट आणि सुंदरबन येथून एक लाखाहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या प्रत्येकी १६ तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याशिवाय ५.४० लाख ताडपत्रींचे वाटप केले आहे, तसेच रेशन, पावडर दूध आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली आहे.

SL/ML/SL

27 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *