राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान , भरपाई द्यावी

 राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान , भरपाई द्यावी

मुंबई, दि.२५ (एमएमसी न्यूज ) राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.

राज्यात काही दिवसांपासून पूर्व विदर्भ, पुणे, कोल्हापूर, रायगड या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी आज माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला.

वडेट्टीवार म्हणाले की, मुंबई आणि पुण्यासारखी मोठी शहरे अतिवृष्टीमुळे जलमय झाली आहेत. या मोठ्या शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतीमधील नागरिकांच्या निवाऱ्याची व्यवस्था सुरक्षितस्थळी करण्यात यावी. विदर्भातील चंद्रूपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून तेथे नागरिकांना मदत करावी. नागरिकांनी जीव धोक्यात घालून घराबाहेर पडू नये. नद्या, नाले, ओढे, धबधबे, धरण, दरडप्रवण क्षेत्र, घाट, पूरप्रवण क्षेत्र, पर्यटनस्थळे अशा ठिकाणी नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहनही वेडेट्टीवार यांनी केले.

अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली शहरांना पुराचा धोका होऊ नये यासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा केली असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *