मराठवाडा कृषी विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी
परभणी, दि. २२ : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी येथे ड्रोन (रिमोट) पायलट प्रशिक्षण सुरु होत आहे. भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ही संस्था, कुशल ड्रोन पायलट तयार करण्यासाठी प्रमाणित प्रशिक्षण देते. या प्रशिक्षणात वर्ग शिक्षण, सिम्युलेटरवर आधारित प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उड्डाण सत्रांचा समावेश आहे. लघु श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस), मध्यम श्रेणी रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (७ दिवस) आणि लघु व मध्यम श्रेणी संयुक्त रिमोट पायलट प्रमाणपत्र कोर्स (१० दिवस) असे विविध अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या अभ्यासक्रमांसाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांचे वय १८ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे वैध वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. प्रवेशासाठी चार पासपोर्ट आकाराचे फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीसह), दहावीची मूळ गुणपत्रिका व प्रमाणपत्र, आधार कार्ड, एक अतिरिक्त ओळखपत्र (जसे की पासपोर्ट, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा रेशन कार्ड), वरील सर्व कागदपत्रांच्या स्वयंघोषित प्रती आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
अधिक माहितीसाठी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथे संपर्क साधता येईल. पात्र माजी सैनिकांनी दूरध्वनी क्रमांक +९१ ७५५०००३७०५ किंवा ई-मेल vnmkv.rpto@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.