रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर ड्रोन हल्ला
मॉस्को, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला गेल्या काही दिवसांपासून काहीसा विराम मिळालेला असताना आज पुन्हा एकदा हे युद्ध एका गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे. युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनने राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना जीवे मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा क्रेमलिन सरकारने केला आहे. रशियन वृत्तसंस्थेच्या हवाल्याने यासंबंधीचं वृत्त रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे. क्रेमलिनने या हल्ल्याला ‘प्लान्ड टेररिस्ट ॲक्शन’ म्हटलं आहे. या हल्ल्यात ड्रोन्सचा वापर केला असल्याचं रशियाने म्हटलं आहे.
रशियन सुरक्षा यंत्रणेने हल्ल्यासाठी वापरलेले दोन्ही ड्रोन्स नष्ट केले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन पूर्णपणे सुरक्षित असल्याचं क्रेमलिनने म्हटलं आहे. तसेच अध्यक्षांच्या इमारतीचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही.
रशियाने या हल्ल्यानंतर एक निवेदन जारी केलं आहे. त्यात रशियाने म्हटलं आहे की, ज्यांनी हा हल्ला केलाय, त्यांना आम्ही सोडणार नाही. तसेच रशियात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुरक्षाविषयक तसेच या हल्ल्याबाबत काही मुद्दे मांडले जातील.
रशियाचे अध्यक्ष सुरक्षित असून त्यांचे नियोजित कार्यक्रम सुरू आहेत. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, क्रेमलिनने युक्रेनवर ड्रोन हल्ल्याचा आरोप केला असला तरी या हल्ल्याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर केला नाही. दुसऱ्या बाजूला युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी क्रेमलिनवरील ड्रोन हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. या हल्ल्याशी युक्रेनचा संबंध नसल्याचं युक्रेन सरकारने म्हटलं आहे. तसेच लवकरच युक्रेन रशियावर मोठा हल्ला करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
SL/KA/SL
3 March 2023