तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोड चा नियम अवघ्या काही तासांतच रद्द
तुळजापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ असणाऱ्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अंगप्रदर्शक कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने काल लागू केला होता. ‘जे भाविक अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय (वेस्टर्न) तसेच हाफ पॅन्ट व बर्मुडा परिधान करून येतील, त्यांना श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही,’ असे या नोटीसीत नमूद करण्यात आले होते. या आदेशांची कालपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीही सुरू झाली होती. पण या प्रकरणी चौफेर टीकेची झोड उठल्यामुळे प्रशासनाने आपला निर्णय मागे घेतला आहे.
मंदिराची शालीनता अबाधित राखण्यासाठी भाविकांना अंगप्रदर्शक कपडे घालून न येण्यासंबंधीचा एक तोंडी निर्णय घेण्यात आला होता. पण रेकॉर्डवर असा कोणताही निर्णय नसल्याचे लक्षात आल्यानंतर असे कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रगटन आम्ही काढले, असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक सौदागर तांदळे यांनी गुरुवारी रात्री उशिरा स्पष्ट केले.
देवीच्या दर्शनासाठी देशविदेशातून भाविक येतात. भाविकांनी दर्शनाला येताना कोणते कपडे परिधान करावेत यासंबंधीचा कोणताही नियम आजतागायत अस्तित्वात नव्हता. पण मंदिर प्रशासनाने बुधवारी एका नोटीसीद्वारे अंगप्रदर्शक कपडे घालून दर्शनासाठी येण्यास मनाई केली होती. तसे फलकही लावले होते. मात्र आता अशी कोणतीही सक्ती नसल्याचे देवस्थानने स्पष्ट केले आहे.
SL/KA/SL
19 May 2023